West Bengal violence: पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधला वाद शिगेला पोहचला आहे. आज भाजपच्या नबन्ना अभियानादरम्यान मोठा गोंधळ झाला. अनेक ठिकाणी पोलिस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. मोर्चा काढणारे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी, खासदार लॉकेट चॅटर्जी आणि राहुल सिन्हा यांच्यासह अने नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना कोलकाता येथील लालबाजार पोलीस मुख्यालयात नेण्यात आले आहे.
पोलिसांची गाडी जाळली
भाजपने मंगळवारी कोलकाता येथील सचिवालयावर मोर्चा काढला(नबन्ना अभिजन मोर्चा). याअंतर्गत राज्यभरातील भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते कोलकाता आणि हावडा येथे पोहोचले. ममता सरकारवरील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवरून भाजपने हा मोर्चा काढला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्येही हाणामारी झाली. काही ठिकाणांहून जाळपोळीचे फोटोही समोर आले आहेत. बडा बाजार पोलिस ठाण्याजवळ पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या.
रस्ता अडवल्यामुळे बोटीवरुन गेले
हावडा ते सचिवालयाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. दुसरीकडे, पूर्व मिदनापूरमध्ये भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे. तिकडे, तमलूकमध्येही भाजप कार्यकर्त्यांची टीएमसी कार्यकर्त्यांशी हाणामारी झाली. मोर्चात सामील होण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना घेऊन कोलकात्याला जाणाऱ्या बसेस पोलिसांनी उत्तर 24 परगणामध्ये रोखल्या. सचिवालयाकडे जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर कार्यकर्त्यांचा एक गट त्रिवेणी नदीतून बोटीने निघाला.
एवढे पोलीस आले कुठून-भाजपचा सवालभाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप घोष यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला ते म्हणाले, "मला आश्चर्य वाटते की पश्चिम बंगालमध्ये इतके पोलीस कुठून आले. कोळसा आणि जनावरांची तस्करी होत असताना हे पोलीस कुठे होते. राज्यात अशांतता असते, बॉम्बस्फोट होतात, तेव्हा पोलीस येत नाहीत. एफआयआर नोंदवायला कोणी आले तरी पोलीस उपलब्ध नसतो. मात्र आज भाजपचा मोर्चा रोखण्यासाठी झारखंड आणि बिहारमधून पोलिसांना पाचारण करण्यात आले आहे. बंगालमध्ये एवढ्या पोलीस आहेत तर इथे एवढी गुन्हेगारी का आहे?'' असा सवाल दिलीप घोष यांनी केला.