रामनवमी शोभायात्रेदरम्यान पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता केंद्रातील मोदी सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी ममता सरकारकडून रामनवमीच्या मुहुर्तावर झालेल्या दंगली आणि खराब कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात रिपोर्ट मागवला आहे. गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना संपूर्ण घटनेचा अहवाल 3 दिवसांत पाठवायला सांगितला आहे. बंगाल भाजप अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून बंगालमध्ये हिंदूंना सातत्याने लक्ष्य केले जात असल्याचे म्हटले आहे.
या पत्रानंतर गृह मंत्रालयाने हा अहवाल मागवला आहे. तत्पूर्वी, गुरुवारी गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस आणि पश्चिम बंगालचे भाजप प्रमुख सुकांत मजुमदार यांच्यासोबत चर्चा करून गुरुवारी हावडा येथे रामनवमी शोभायात्रेदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता.
हावडा आणि हुगळीमध्ये झाला हिंसाचार -राज्यपालांनी अमित शहा यांना हिंसाचार आणि सद्यस्थितीसंदर्भात माहिती दिली आहे. हावडा येथे जमावाने मठ्या प्रमाणावर धुडगूस घातला, वाहने जाळली, दगडफेक केली आणि दुकानांचीही तोडफोड केली. यानंतर संबंधित भागांत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांच्या अनेक वाहनांचेही नुकसान झाले. हावडानंतर रविवारी हुगळीत हिंसाचार उफाळून आला होता.
सुकांत यांनी काय म्हटलंय पत्रात? -सुकांत मजुमदार यांनी आपल्या पत्रात लिहिले, हुगळी जिल्ह्यातही भाजपच्या मिरवणुकीतही गोंधळ घालण्यात आला. यानंतर रेल्वे स्थानकांवर जोरदार दगडफेक झाली. यानंतर रेल्वे सेवा निलंबित करण्यात आली आणि हे पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष टीएमसी आणि त्यांच्या समर्थनाशिवाय सुरू ठेवले जाऊ शकत नव्हते. याशिवाय, भाजपचे अध्यक्ष आणि लोकसभा खासदार सुकांत मुझुमदार यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यातील हिंसाचाराच्या घटनांसंदर्भात राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांचीही भेट घेतली.