नवी दिल्ली - पश्चिम बंगालने ओडिशासोबत गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेली 'रसगुल्ला लढाई' जिंकली आहे. दोन्ही राज्यांनी रसगुल्ला आपला असल्याचा दावा करत जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. मात्र रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. यामुळे आता अधिकृतपणे रसगुल्ला पश्चिम बंगालचा असल्याचं सिद्ध झालं असून, त्यांनी जीआय मानांकन मिळालं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही गोड बातमी राज्यातील लोकांसोबत शेअर केली आहे. 'सर्वांसाठी गोड बातमी आहे. रसगुल्लासाठी बंगलला जीआय मानांकन मिळाल्याने आम्ही खूप आनंदी आणि अभिमानी आहोत', असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
सप्टेंबर 2015 मध्ये ओडिशा सरकारने 'रसगुल्ला दिवस' किंवा 'रसगुल्ला डे' साजरा करण्यास सुरुवात केली होती. याचवेळी दोन्ही राज्यांमधील हे रसगुल्ला युद्ध सुरु झालं होतं. ओडिशा सरकारने दावा केला होता की, रथ यात्रेदरम्यान देव जगन्नाथ पत्नी देवी लक्ष्मीला घरी एकटे सोडून गेले होते. यामुळे लक्ष्मी देवी प्रचंड चिडल्या होत्या. त्यांनी जगन्नाथ देवाला घरात प्रवेश देण्यास नकार दिला होता. यावेळी त्यांचा राग शांत करण्यासाठी जगन्नाथ देवाने रसगुल्ले दिले होते.
पुरीतल्या जगन्नाथ मंदिरात रसगुल्ला खीरमोहन या नावानं देवासमोर प्रसादासाठी ठेवला जायचा. प्रसादाची ही प्रथा मागील कित्येक दशकांपासून जगन्नाथ मंदिरात राबवली जाते, असं ओडिशा सरकारने सांगितलं.
पश्चिम बंगालने मात्र ओडिशा सरकारचा हा दावा फेटाळून लावला होता. रसगुल्ल्यासाठी प्रक्रिया केलेलं दूध वापरलं जातं, जे पुजेसाठी वापरलं जात नाही किंवा त्याचा प्रसाद देवाला चढवला जात नाही. त्यामुळे जगन्नाथ देवाने लक्ष्मीला रसगुल्ला देण्याचा काही संबंध नाही असं पश्चिम बंगाल सरकारचं म्हणणं आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा पश्चिम बंगालमधील लाखो रसगुल्ला उत्पादकांना होणार आहे.
जीआय मानांकन म्हणजे काय?विशिष्ट भूभागातील माती, पाणी आणि वातावरणामुळे, तसेच शेतक-यांच्या व्यवस्थापन कौशल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार आदी गुणवैशिष्ट्यांमध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र ‘जीआय’ अर्थात ‘भौगोलिक निर्देशन’ मानांकनातून मिळते.
भौगोलिक निर्देशन (जीआय) अधिकारांतर्गत उत्पादनांची क्षमता, दर्जा आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळींवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबींमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते. मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनांचा दर्जा, भौगोलिकदृष्ट्या पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश आदींबाबत विश्वासार्हता निर्माण होते.