पश्चिम बंगालमधील भाजपाच्या एका महिला नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 'जे लोक पश्चिम बंगालमधील रथयात्रा रोखण्याचा प्रयत्न करतील त्यांना रथाच्या चाकाखाली चिरडून टाकू' असं वक्तव्य राज्य महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी केलं आहे. मालदा जिल्ह्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. राज्यात लोकशाही स्थापन करण्याच्या उद्देशाने ही रथयात्रा आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी तीन रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकी आधी ही रथयात्रा राज्यातील सर्व 42 लोकसभा मतदारसंघात काढली जाणार आहे. 5, 7 आणि 9 डिसेंबरला ही रथयात्रा निघेल. रथयात्रेच्या समाप्तीनंतर पक्षाची कोलकाता येथे एक सभा होणार असून त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.
भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष लॉकेट चॅटर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथयात्रेचा मुख्य उद्देश हा पश्चिम बंगालमध्ये लोकशाही बहाल करणे आहे. त्यामुळे रथ यात्रा रोखणाऱ्यांना रथाच्या चाकाखाली चिरडू. चॅटर्जी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा सत्तारुढ तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी निषेध केला आहे. भाजपा नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यातील शांतता आणि स्थिरता भंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.