ऑनलाइन लोकमत
मीरपूर, दि. १४ - शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने तीन चेंडू आणि पाच गडी राखून भारतावर विजय मिळवत अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
अहमदच्या चेंडूवर एक धाव घेत पॉलने वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. वेस्ट इंडिजने पहिल्यांदाच अंडर १९ वर्ल्डकप पटकावला. भारताचे १४६ धावांचे लक्ष्य वेस्ट इंडिजने ४९.३ षटकात पार केले.
भारताने दिलेल्या १४६ धावांच्या तुटपुंज्या लक्ष्याचा पाठलाग करताना एका टप्प्यावर वेस्ट इंडिजच्या ३० षटकात पाच बाद ८० धावा झाल्या होत्या. त्यावेळी वेस्ट इंडिजचा डाव सवयीप्रमाणे कोलमडतोय कि, काय असे वाटत होते.
पण पॉल आणि कार्टीने सहाव्या विकेटसाठी नाबाद ६९ धावांची भागादीरी रचून वेस्ट इंडिजला पहिले वहिले अंडर १९ वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवून दिले. कार्टीने नाबाद ५२ आणि पॉलने नाबाद ४० धावांची खेळी केली. लक्ष्य तुटपुंजे असूनही भारतीय गोलंदाजांनी संघर्ष केला पण कार्टी आणि पॉलने त्यांना यशस्वी होऊ दिले नाही.
भारताने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारतीय संघाला विजयाची पसंती दिली जात होती. पण युवा वेस्ट इंडिज संघाने महत्वाच्या सामन्यात भारताला पराभवाचा दणका दिला.
वेस्ट इंडिजचा डाव सुरु झाल्यानंतर प्रारंभीच पोपच्या रुपाने पहिला धक्का बसला. अवघ्या ३ धावांवर अवेश खानने त्याला अहमदकरवी झेलबाद केले. त्यानंतर संघाच्या २८ धावा असताना इमलाच १५ धावांवर बाद झाला.
त्यानंतर कर्णधार हेटमायर आणि कार्टीने तिस-या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करुन डाव सावरला. ही जोडी स्थिरावणार असे वाटत असतानाच डागरने हेटमायरला २३ धावांवर अरमान जाफरकरवी झेलबाद केले.७१ धावांवर स्प्रिंजरच्या रुपाने चौथा त्यानंतर काही धावांच्या अंतराने गुलीच्या रुपाने पाचवा गडी बाद झाला. डागरने तीन, अवेश खान आणि केके अहमदने प्रत्येकी एक गडी बाद केला.
अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजच्या भेदक गोलंदाजीमसोर भारताचा डाव अवघ्या ४५.१ षटकात १४५ धावात आटोपला. सरफराझ खानचा ५१ अपवाद वगळता अन्य भारतीय फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
भारताने वेस्ट इंडिजला विजयासाठी १४६ धावांचे लक्ष्य दिले आहे. लोमरॉर आणि सरफराझ खानमध्ये सहाव्या विकेटसाठी झालेली ३७ धावांची भागीदारी ही भारताच्या डावातील सर्वात मोठी भागीदारी ठरली.
पहिल्या षटकापासून वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारताच्या फलंदाजीला वेसण घातली. पन्नास धावातच भारताचा निम्मा संघ तंबूत परतला होता. सरफराझ खानने एकबाजू लावून धरल्यामुळे निदान भारताला १४५ पर्यंत तरी पोहोचता आले.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. भारताकडून सरफराझ खानने सर्वाधिक ५१, लोमरॉरने १९ आणि बाथम २१ वगळता अन्य फलंदाज दोन आकडी धावाही करु शकले नाहीत. सलामीवीर आरआर पंत (१), कर्णधार इशान किशन (४), अनमोलप्रित सिंग (३) , वॉशिंग्टन सुंदर (७) आणि अरमान जाफर (५) धावांवर स्वस्तात माघारी परतले.
चौथ्यांदा अंडर १९ वर्ल्डकपचे जेतेपद पटकावण्यासाठी भारतीय संघाला संधी होती. वेस्टइंडिजकडून जोसेफ आणि जॉनने प्रत्येकी तीन, पॉलने दोन, होल्डर आणि स्प्रिरंजरने प्रत्येकी एक गडी बाद केला.