अगरताळा – देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात बहुतांश राज्यात नाईट कर्फ्यूही लावण्यात आला आहे. यात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ जिल्हाधिकारी एक लग्न समारंभात जाऊन तेथील सर्व मंडळींवर गुन्हा दाखल करून अनेकांची खरडपट्टी काढताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला. याबाबत ५ आमदारांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून जिल्हाधिकारी शैलेश यादव यांच्या निलंबनाची मागणी केली होती. त्यानंतर आयएएस शैलेश यादव यांच्या प्रकरणात उच्च स्तरीय चौकशी होऊन त्यानंतर पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत शैलेश यादव म्हणाले की, मी जे काही केले लोकांच्या हितासाठीच केले. माझा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता. कोविड मार्गदर्शक सूचनेचं पालन करणं माझं कर्तव्य होतं. मी उच्चस्तरीय समितीच्या चौकशीसमोर माझं म्हणणं मांडेन असं सांगितले आहे.
लग्नासाठी बंगळुरूहून आला होता नवरदेव
बंगळुरूहून नवरदेव लग्नासाठी त्रिपुरा येथे आला होता. याठिकाणी प्रसिद्ध डॉक्टरच्या मुलीसोबत त्याचे लग्न होते. मुलीच्या घरच्यांकडून जिल्हा प्रशासन ते मॅरेज हॉलपर्यंत सर्वांची परवानगी घेतली होती. रात्री लग्नाचे विधी सुरू असताना अचानक जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव पोलिसांच्या गराड्यात मॅरेज हॉलला पोहचले तिथे गोंधळ झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी पंडितच्या कानशिलात लगावली. नवरदेव आणि पाहुणे मंडळींना धक्का मारून बाहेर काढलं होतं. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांच्या कृत्याचा निषेध केला होता.
काय होतं प्रकरण?
व्हायरल व्हिडीओमध्ये शैलेश कुमार एका हॉलमध्ये जाऊन लग्न सोहळा थांबवताना दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी उपस्थितांना कठोर शब्दांत सुनावलं. यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवर आता टीका होऊ लागली आहे. शैलेश यांनी नवरदेवाला धक्के मारून बाहेर काढलं. या प्रकरणी आपत्ती प्रतिबंधात्मक अधिनियमांच्या अंतर्गत अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यांनी ३० जणांना अटक केली. मात्र थोड्याच वेळात त्यांची सुटका झाली.