शरद गुप्ता -
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यासाठी १० फेब्रुवारी रोजी मतदान असून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्रचार संपणार आहे. संघर्ष भाजप आणि समाजवादी पार्टी-रालोद युती यांच्यातच तीव्र होणार असे दिसते. त्यातही भाजपला काहीशी संधी दिसत आहे. असे मानले जाते की, पहिला टप्पा जिंकणारा पक्षच राज्यात सरकार स्थापन करतो. यादवेतर मागास वर्ग अजूनही भक्कमपणे भाजपसोबत असल्यामुळे त्यांच्याच बळावर भाजपने गेल्या ८ वर्षांत झालेल्या दोन लोकसभा आणि एका विधानसभा निवडणुकीत तीन चतुर्थांशपेक्षा जास्त बहुमत मिळवले.मुजफ्फरनगर दंगलींमुळे निर्माण झालेली धार्मिक आधारावरील विभागणी अजून संपलेली नाही. याचमुळे निवडणुकीत जातीय समीकरण कोठे ना कोठे वरचढ झाले आहे. प्रजापती, वाल्मिकी, नाभिक, नट, धोबी, बंजारा, सैनीसारख्या अति मागास जाती आजही भाजपसोबत आहेत. जाटांमधील विभागणी भाजपसाठी मोठ्या समाधानाची बाब आहे. विभागात ३५ टक्के मुसलमान आणि १६ टक्के जाट मिळून जिंकणारे समीकरण बनते. जाटांचा एक भाग युतीच्या बाजूने आहे. परंतु, जेथे मुसलमान मोठ्या संख्येने आहेत तेथेच त्याचा प्रभाव पडेल.