अहमदाबाद - आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहेत. त्यादृष्टीने राजकीय पक्षांच्या हालचालीही सुरू आहेत. त्याचाच, एक भाग बनून भाजपा समर्थक नव नवी शक्कल लढवून मोदी सरकारचे समर्थन करत आहे. गुजरातमधील एका जोडप्याने लग्न पत्रिकेवर चक्क राफेल डीलबाबतचे मुद्दे छापले असून या करारात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे म्हटले आहे.
गुजरातमधील या जोडप्याने लग्न पत्रिकेतून आगामी निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तर सोबतच राहुल गांधींच्या राफेल कराराबाबतच्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. देशात पंतप्रधान मोदींच्या चाहत्यांची संख्या अद्यापही मोठी आहे. एकीकडे मोदींवर टीका होत असताना, दुसरीकडे मोदींवर प्रेम करणाऱ्यांचीही संख्या जगभरात आहेत. गुजरातमधील अशाच एक मोदीप्रेमी जोडप्याने चक्क लग्न पत्रिकेत राफेल डीलसंदर्भातील मुद्दे मांडले असून मोदींना आरोपमुक्त ठरवले आहे.
गुजरातमधील युवराज आणि साक्षी या जोडप्याचा 22 जानेवारी रोजी विवाह आहे. त्यासाठी, निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या आहेत. या लग्नपत्रिकेतील पहिल्या पानावर सर्वकाही नित्यनियमाप्रमाणे म्हणजेच सर्वसाधारण लग्नपत्रिकेप्रमाणे छापण्यात आले आहे. नवऱ्या मुलाचे नाव, नवरी मुलीचे नाव, लग्नाची वेळ ठिकाण, देवांचे फोटो आणि कुटुंबाची माहिती देण्यात आली आहे. मात्र, शेवटची एक ओळीतून मोदींना मतदान हेच आमचे गिफ्ट असे लिहिण्यात आले आहे. तर लग्न पत्रिकेच्या दुसऱ्या पानावर राफेल करारासंदर्भाची सर्व माहिती देण्यात आली आहे. ही लग्नपत्रिका इंग्रजीत असून राफेलची माहितीही इंग्रजीतच छापण्यात आली आहे. शांत रहा अन् मोदींवर विश्वास ठेवा... असे या पत्रिकेत छापण्यात आले आहे. ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, कर्नाटक भाजपाच्या महिला सरचिटणीस शोभा करंडलाजे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही लग्नपत्रिका शेअर केली आहे.