नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवानांचे अद्याप आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, ब्रिजभूषण शरण सिंह यांनी रविवारी आंदोलक कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांवर म्हटले की, "जर माझ्यावरील एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वतः फाशी घेईन". पीटीआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.
ही बातमी अशा वेळी आली आहे, ज्यावेळी दिल्लीच्या शेजारील राज्यातील शेतकरी कुस्तीपटूंना पाठिंबा देण्यासाठी येथील जंतरमंतर येथे महापंचायत आयोजित करणार आहेत, जिथून ते पुढील रणनीती ठरवतील. दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय राजधानीत शेतकऱ्यांच्या प्रवेशासाठी उत्तर प्रदेशला लागून असलेल्या सिंघू आणि टिकरी सीमेवर पाळत ठेवली आहे. जंतरमंतरवरही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
शनिवारी हरयाणाच्या सोनीपतमध्ये लववंशीय खत्री खाप आणि जटवारा 360 खापने दिल्लीत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना पाठिंबा दर्शवला आहे. आरोपी भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर सरकारने कारवाई केली नाही, तर शेतकरी आंदोलनात ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली जाम केली होती, त्याचप्रमाणे खाप पुन्हा दिल्ली जाम करतील, असा इशारा दिला आहे.
दिल्लीतील पाणी, दूध आणि रेशनचा पुरवठाही विस्कळीत होईल, असा दावा खाप सदस्यांनी केला. सोनीपत येथील रेल्वे रोडवरील एका खासगी कार्यालयात खत्री खाप आणि जटवारा 360 खाप यांच्या गटाची बैठक पार पडली, त्यात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना एकमताने पाठिंबा देण्यात आला. लववंशीय खत्री खापचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्र खत्री म्हणाले की, आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना सर्व खापांचा पूर्ण पाठिंबा आहे.
बजरंग पुनिया, विनेश फोगट, साक्षी मलिक यांच्यासह अव्वल कुस्तीपटू 23 एप्रिलपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एका अल्पवयीनासह सात कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी आंदोलन करत आहेत. तसेच, त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत.