कुजबूज--आणखी दोन
By admin | Published: May 05, 2015 1:21 AM
दोन पीडीए चेअरमन
दोन पीडीए चेअरमनकळंगुटचे आमदार मायकल लोबो हे नेहमी अनेक कारणास्तव चर्चेत असतात. लोबो हे उत्तर गोवा पीडीएचे चेअरमन आहेत. एकदम दोन वर्षांसाठी पीडीएला मुदतवाढ मिळालेली लोबो यांना हवी आहे; पण मुख्यमंत्री पार्सेकर हे लोबोंची ही इच्छा पूर्ण करत नाहीत. लोबो हे सरकारशी खेळतात व मुख्यमंत्री लोबोंशी. लोबोची एका प्रकरणी एसीबीकडून चौकशी केली जात आहे. त्यांना यापूर्वी एसीबीच्या पायर्या चढाव्या लागल्या आहेत. कळंगुटमध्ये काही बांधकामांवर बुलडोझर फिरविल्याप्रकरणी पोलिसांत त्यांच्याविरुद्ध गुन्हाही नोंद झाला आहे. तरीही ते पीडीएचे चेअरमन आहेत. वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनाही नुकतेच सरकारने वास्को पीडीएचे चेअरमनपद दिले. कदंबमध्ये अर्थ राहिला नसल्याने त्यांना पीडीए दिले असावे. योगायोग म्हणजे पालिकेच्या एका खरेदी प्रकरणी आता एसीबीकडून कार्लुसलाही चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे.म.गो.शी संबंधमहाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी असलेले आपले संबंध तोडावेत की नको याविषयी भाजपमध्ये खल सुरू आहे. मगो पक्षाची आता आपल्याला गरज नाही, असे मंत्रिपदासाठी आतुरलेल्या भाजपच्या काही आमदारांना वाटते. मात्र, भाजपचे नेते पर्रीकर, मुख्यमंत्री पार्सेकर वगैरेंना थोडे वेगळे वाटते. भाजप व म.गो.पक्षाची युती तुटली तर २०१७ सालच्या निवडणुकीवेळी काय होऊ शकते, याची पुसटशी कल्पना भाजपमधील कोअर टीमला आहे. त्यामुळे मगो पक्षाशी असलेली युती सध्या तरी तोडायची नाही, असे भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांना वाटते. म.गो.पक्ष काँग्रेससोबत गेला तरी, भविष्यात आपल्यासाठी समस्या निर्माण होईल, असेही भाजपमधील जाणकार मानतात. मात्र, म.गो. पक्ष आपल्यासोबत राहूनही काही मतदारसंघांमध्ये स्वत:चे बळ वाढवतोय, अशी खंतही भाजपचे काही आमदार व्यक्त करतात. भाजपचे नेते आता स्वत:च्या आमदारांचे ऐकतील की भविष्याचा विचार करून युती कायम ठेवतील ते यापुढे कळेलच.