राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. कर्नाटकात तिकीट मिळाले नाही म्हणून भाजपाच्या बड्या बड्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये उडी मारली. हे ठीक, परंतू जर एखाद्याने उमेदवारीच नाही तर महापौरपदासाठी घोषणा होऊनही दुसऱ्या पक्षात उडी मारली तर काय म्हणाल. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये सपाच्या बाबत असे घडले आहे.
अर्चना वर्मा यांना सपाने शाहजहांपूरमध्ये महापौर पदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते. परंतू ताईंनी सपा सोडून भाजपात जात सर्वांनाच चकीत केले आहे. अर्चना वर्मा यांनी लखनऊमध्ये जात भाजपाचे सदस्यत्व घेतले आणि सपामध्ये खळबळ उडाली.
अर्चना या २००५ मध्ये जिल्हा पंचायत अध्यक्ष बनल्या होत्या. त्या सपा सरकारमध्ये मंत्री राहिलेले आणि चारदा आमदार असलेले राममूर्ति वर्मा यांच्या सूनबाई आहेत. सपाशी एवढे घनिष्ट संबंध असतानाही अर्चना यांनी भाजपात उडी मारली आहे. १२ एप्रिलला अर्चना यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते. ऐनवेळी अर्चना यांनी सपा सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दोन वर्षआंपूर्वी जिल्हा पंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने सपाला असाच धक्का दिला होता. ऐन वेळी सपाचे उमेदवार वीनू सिंह यांनी भाजपात प्रवेश केला होता. यामुळे भाजपाच्या उमेदवार ममता यादव या बिनविरोध निवडून आल्या होत्या.