आग्रा - ताजमहालाच्या तळघरात बंद असलेल्या ज्या २२ खोल्यांवरून सध्या वाद सुरू आहे. त्या खोल्यांचे फोटो भारतीय पुरातत्व विभागाने प्रसिद्ध केले आहेत. २०२२ मध्ये याची दुरुस्ती केली होती तेव्हा हे फोटो काढण्यात आले होते. आग्रा एएसआयचे प्रमुख आर. के. पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार हे फोटो जानेवारी २०२२ मध्ये न्यूजलेटरच्या रूपात एएसआयच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कुणीही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन हे फोटो पाहू शकतो.
याबाबत सांगण्यात आले की, या बंद खोल्यांमध्ये दुरुस्तीचं काम केलं गेलं होतं. या कामामध्ये सुमारे ६ लाख रुपये खर्च झाला होता. तर पर्यटन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, या खोल्यांमध्ये काय आहे. याबाबत चुकीच्या गोष्टी पसरू नये म्हणून हे फोटो सार्वजनिक करण्यात आले आहेत.
अलाहाबाद हायकोर्टामध्ये डॉ. रजनीश कुमार यांच्यावतीने ताजमहालातील २२ खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र बेंचने ही याचिका फेटाळून लावली होती. याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने सांगितले होते की, तुम्ही एका समितीच्या माध्यमातून याबाबतच्या माहितीचा शोध घेण्याची मागणी करत आहात. तुम्ही नेमके आहात कोण? तो तुमचा अधिकार नाही आहे. तसेच हे आरटीआयच्या कक्षेतही येत नाही. आम्हाला तुमचा युक्तिवाद मान्य नाही. खोल्या उघडण्याची मागणी करण्यासाठी ऐतिहासिक शोध घेण्याची गरज आहे. आम्ही रीट याचिकेवर विचार करण्यास सक्षम नाही आहोत.