Jagdeep Dhankhar News: "आता शेतकऱ्यांचं एकच काम राहिले आहे. त्याला मर्यादित करून टाकलं आहे. एकतर शेतात धान्य पिकवा आणि त्याला योग्य दर मिळवण्यासाठी सोसत रहा. आपण फॉर्म्युल्याची अंमलबजावणी का करत नाही, हे मला कळत नाहीये", असे म्हणत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी मोदी सरकार आणि कृषी मंत्र्यांचे कान पिळले.
मोबदला सोडा, थकीत पैसैही दिले जात नाहीये -धनकड
एका कार्यक्रमात बोलताना जगदीप धनकड म्हणाले, "अर्थशास्त्रज्ञ, थिंक टँकसोबत फॉर्म्युला अंमलबजावणीबद्दल चर्चा का करत नाही. आपण शेतकऱ्यांना चांगला मोबदला दिला पाहिजे. पण, आम्ही तर चांगला मोबदला सोडा, त्याचे थकीत पैसेही देत नाहीये. त्यातही कंजूषपणा करत आहोत. ज्याची तरतूद केली गेली आहे. आणि मला समजत नाहीये की, शेतकऱ्यांशी चर्चा का केली जात नाहीये", अशा शब्दात धनकड यांनी सरकारला खडेबोल सुनावले.
"मला खूप चांगलं वाटलं की, जगजीत सिंह यांनी जाहीरपणे माहिती घेतली की मी काय म्हणालो? त्यानंतर त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या की, शेतकऱ्याला हमीभाव देणारा कायदा पाहिजे. उदार मनाने बघा. उदार मनाने विचार करा", अशा शब्दात धनकड यांनी सरकारचे कान टोचले.
लेखी वचनाचे काय झालं, उपराष्ट्रपतींचा कृषीमंत्र्यांना सवाल
"समजून घ्या. देण्याचे काय फायदे आणि न देण्याचे काय नुकसान आहे. तुम्हाला कळेल यात नुकसानच नुकसान आहे. दुसरं म्हणजे कृषी मंत्र्यांनी जे लेखी वचन दिलं होतं, त्याचं काय?", असा सवाल करत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांना कोंडीत पकडलं.