प्रश्न - मी अमेरिकी नागरिकाशी लग्न करणार आहे. आणि अमेरिकेला जाण्याचा आमचा विचार आहे. स्थलांतराची प्रकिया कशी असेल.
उत्तर - भावी विवाहासाठी तुमचं अभिनंदन! तुमच्या विवाहाच्या नियोजनानुसार स्थलांतराची प्रक्रिया ठरते. भारतात लग्न करायचं आणि मग अमेरिकेला जायचं असा तुमचा विचार आहे?की आधी अमेरिकेला जायचं आणि तिथं लग्न करायचं असं तुम्हाला करायचंय.
जर आधी भारतात लग्न करायचं तुम्ही ठरवलं असेल तर तुमच्या जोडीदारानं तुमच्या कंडिशनल रेसिडेंट व्हिसा ज्याला CR-1 व्हिसा असंही म्हणतात, त्यासाठी अर्ज करायला हवा. ज्या विदेशी व्यक्तिच्या अमेरिकी व्यक्तिशी झालेल्या विवाहाला अद्याप दोन वर्षे पूर्ण झालेली नाहीत, त्यांच्यासाठी हा व्हिसा असतो. या व्हिसावर अमेरिकेत आलात की, तुम्ही आपोआप कंडिशनल परमनंट रेसिडेंट होता आणि दोन वर्षांसाठीचे ग्रीन कार्ड तुम्हाला देण्यात येते. या ग्रीन कार्डची मुदत संपण्याआधी तीन महिने तुम्हाला कंडिशन्स काढून टाकण्यासाठी अर्ज करावा लागतो व मग तुम्ही कायदेशीर संपूर्ण नागरिक किंवा लीगल परमनंट रेसिडेंट (LPR) होता.
अमेरिकेत दाखल झाल्यानंतर लग्न करण्याचा तुमचा विचार असेल तर तुमच्या भावी जोडीदाराने तुमच्या फियान्से व्हिसासाठी अर्ज करायचा असतो. याला K-1 व्हिसा असंही म्हणतात. अमेरिकेत दाखल झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत जे अमेरिकी नागरिकाशी लग्न करतात, त्यांच्यासाठी हा व्हिसा आहे. विवाह पार पडल्यानंतर तुम्ही परमनंट व्हिसासाठी अर्ज करायचा असतो. या दरम्यानच्या काळात तुम्ही अमेरिकेत राहू शकता. ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्ही कायदेशीर संपूर्ण नागरिक किंवा लीगल परमनंट रेसिडेंट (LPR) होता.
कंडिशनल रेसिडेंट व्हिसा मिळायला जरा जास्त वेळ लागतो, परंतु तुम्ही अमेरिकेत दाखल झाल्यानंतर लगेचच परमनंट रेसिडेंट होता. तर फियान्से व्हिसा लगेच मिळतो, मात्र परमनंट रेसिडेंट होण्यासाठी थोडा जास्त काळ लागतो. तसेच, वर्क परमिटसाठी, स्टेटस बदलण्यासाठी अर्ज करणे अशा काही प्रक्रिया तुम्हाला फियान्से व्हिसाच्या बाबतीत कराव्या लागतात, ज्या परमनंट रेसिडेंट असल्यास लागत नाहीत.
त्यामुळे, आम्ही सल्ला देतो, की आधी तुमच्या लग्नाचं नियोजन नक्की करा आणि त्यानुसार कुठल्या प्रकारच्या व्हिसासाठी अर्ज करायचा ते ठरवा.
आणखी वाचा