नवी दिल्ली: पुलवामासारखा दहशतवादी हल्ला पुन्हा होऊ नये यासाठी आवश्यक ती पावलं उचलू, असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. पुलवामातील हल्ल्यानंतर आम्ही माहिती गोळा करत आहोत, असं त्या म्हणाल्या. मात्र याबद्दल अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. बंगळुरुत उद्यापासून एअर शो सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला सीतारामन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. 2008 मध्ये मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाचा हात होता. त्याचे पुरावेदेखील तत्कालीन सरकारनं पाकिस्तानला दिले होते. त्याचं पाकिस्ताननं काय केलं, असा सवाल सीतारामन यांनी विचारला. 'दहा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात होता. त्यावेळी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया भारतानं पाळली. हल्ल्यातील पाकिस्तानचा सहभाग दाखवणारे सर्व पुरावे दिले. भारतानं दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडलं. या प्रकरणाचा खटला भारतात चालवण्यात आला. कसाबला शिक्षा सुनावली गेली. मात्र पाकिस्तानच्या कनिष्ठ न्यायालयानंदेखील या प्रकरणात काहीच केलं नाही. त्यामुळे याबद्दल पाकिस्तानकडे बोलण्यासारखं काहीच नाही,' असं सीतारामन म्हणाल्या. मुंबईवरील हल्ल्यानंतर तत्कालीन सरकारनं सर्व पुरावे पाकिस्तानला दिले. आमच्या सरकारनंही आवश्यक ते सर्व पुरावे पाकिस्तान सरकारकडे सुपूर्द केलं. मात्र त्यांनी काय कारवाई केली, असा प्रश्न संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला विचारला. भारताकडून पाकिस्तानवर बेछूट आरोप केले जात आहेत, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. याबद्दलच्या प्रश्नावर भाष्य करण्यास सीतारामन यांनी नकार दिला. संपूर्ण देशात आज संतापाची लाट आहे. प्रत्येक देशवासीयाच्या मनात प्रचंड राग आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पाकिस्तानला जे काही उत्तर द्यायचं आहे, ते आता सैन्याकडून दिलं जाईल. त्यासाठी सैन्याला संपूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. त्यामुळे योग्य ती कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.