नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. आज सकाळी ९ वाजता व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार असल्याची माहिती स्वत: नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चला देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. त्यानुसार देशात २१ दिवस लॉकडाऊन सुरू आहे. याआधी एक दिवसाचा जनता कर्फ्यू घोषित केला होता. यानंतर आता लॉकडाऊन दरम्यान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे नक्कीच जनता कर्फ्यू, लॉकडाऊनच्या घोषणेनंतर नरेंद्र मोदी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी ९ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार असल्याचे नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. इंग्रजी आणि हिंदी भाषेतून त्यांनी ही माहिती दिली आहे. देशात २५ मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींनी काल देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व राज्यांनी आखलेल्या उपाययोजनांचे त्यांनी कौतुक केले.
दरम्यान, देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध कल्पना शेअर करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात काय करावे?, कोरोनापासून बचाव करण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी?, यासंबंधी टिप्स नरेंद्र मोदी ट्विटरच्या माध्यमातून देत आहेत. याशिवाय, लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांना घरीच राहावे लागत आहे. या दिवसांचा सदुपयोग करावा, योगासने करावीत, अशा काही टिप्स नरेंद्र मोदींनी देशवासीयांना दिल्या आहेत. या संदर्भातले काही व्हिडीओदेखील त्यांनी ट्विट केले आहेत.