ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - भाजपमधून निलंबित करण्यात आलेले खासदार किर्ती आझाद यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांना लिहीलेल्या पत्रामध्ये पक्षविरोधी कारवाया केल्याचा पुरावा मागितला आहे. मी काय पक्ष विरोधी कारवाई केली त्याचा पुरावा द्या. मी आजही भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे असा दावा आझाद यांनी शहांना लिहीलेल्या पत्रात केला आहे.
आपल्याला पाठवलेल्या निलंबनाच्या पत्रात डीडीसीए घोटाळयाचा उल्लेख नसल्याचे आझाद यांनी शहांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. डीडीसीए प्रकरणाचा पक्षाक्षी काहीही संबंध नसल्याचे आझाद यांचे म्हणणे आहे.
किर्ती आझाद यांनी रविवारी पत्रकारपरिषद घेऊन डीडीसीएतील कथित घोटाळयावरुन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. किर्ती आझाद दरभंगामधून तिस-यांदा लोकसभेवर निवडून गेले आहेत.