अयोध्येतील राम मंदिर मंगळवारपासून सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. आज सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. मंदिर परिसरातच लांबच लांब रांगा लागल्या आहेत. भाविकांना सुरक्षेच्या अनेक फेऱ्या पार कराव्या लागतात. मंदिर आणि परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या अयोध्येत फक्त त्या वाहनांना परवानगी आहे, ज्यांच्याकडे आधीच 'पास' आहेत. शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
अयोध्येत राम मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी सुरक्षा तपासणी करावी लागणार आहे. मंदिरात सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास मनाई आहे. म्हणजेच मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, इयरफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन तुम्ही मंदिरात जाऊ शकणार नाही. याशिवाय मंदिरात बाहेरून प्रसाद नेण्यास मनाई आहे.
रामललाच्या आरतीला भाविकांना हजेरी लावायची असेल, तर त्यांना रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून ‘पास’ घ्यावा लागेल. हा 'पास' मोफत आहे. कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. पण ट्रस्ट 'पास' देण्यापूर्वी ओळख पडताळेल. यासाठी आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह कोणतेही वैध ओळखपत्र देणे आवश्यक आहे. भाविकांचे सामान ठेवण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. राम मंदिराची वेबसाईट देखील https://srjbtkshetra.org/contact-us/ आहे. याशिवाय, एक अधिकृत ट्विटर अकाऊंट https://twitter.com/ShriRamTeerth देखील आहे.
आरतीमध्ये 30 जणांना सहभागी होण्याची परवानगी
रामललाच्या आरतीमध्ये सध्या फक्त 30 लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी आहे. मंदिरात एकूण 35 आरत्या होणार आहेत. या 35 आरत्यांमध्ये भाविकांना सहभागी होता येणार आहे. मंदिर ट्रस्टचा पास घेऊन भाविकांना सकाळी 6.30, 11.30 आणि संध्याकाळी 6.30 वाजता आरती करता येणार आहे. भाविकांना परिसरात फिरता येईल.