Corona in Kerala: केरळात कोरोनाचा कहर कशामुळे? महाराष्ट्राला धोक्याची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 10:23 AM2021-08-27T10:23:25+5:302021-08-27T10:23:49+5:30
गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा वेगही लक्षणीय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क : कोरोनाची दुसरी लाट पूर्णत: ओसरल्याने एकीकडे आनंद व्यक्त होत असताना केरळातून मात्र चिंताजनक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होण्याचा वेगही लक्षणीय आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही, हाच संकेत मिळत आहे.
कशामुळे वाढत आहेत बाधित?
अलीकडेच झालेल्या धार्मिक सणोत्सवांमध्ये लोकांनी गर्दी केली. सामाजिक अंतर पाळण्याचे नियम पायदळी तुडवले गेले. त्यातच निर्बंध सैल झाल्याने लोकांचे बाहेर येणे-जाणे वाढले आहे.
आखाती देश तसेच इतर देशांतून केरळमध्ये परतणाऱ्यांची संख्या वाढल्याने कोरोना वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने चाचण्यांचा वेग वाढवला
असल्यानेही बाधितांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांनी मांडले आहे.
सर्वाधिक रुग्णसंख्या
एर्नाकुलम जिल्ह्यात ४००० हून अधिक बाधित सापडले. त्रिचूर, कोळिकोड आणि मलप्पुरम या तीन जिल्ह्यांत ३००० हून अधिक बाधित आढळले.
लसीकरणाचा वेग
इतर राज्यांच्या तुलनेत केरळचा लसीकरणाचा वेग अधिक आहे.
केरळच्या एकूण २ कोटी लोकसंख्येपैकी २३ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे.
५४ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
संपूर्ण लसीकरण झालेल्या हजारो लोकांना कोरोनाची पुन्हा लागण झाल्याचेही निदर्शास आले आहे.