नवी दिल्ली: कथुआ बलात्कार प्रकरणाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे. देशातल्या कोणत्याही भागात अशा प्रकारची घटना घडणं लज्जास्पद आहे, अशा कठोर शब्दांमध्ये राष्ट्रपतींनी कथुआ बलात्कार प्रकरणाबद्दल संताप व्यक्त केला. आपला समाज नेमका कुठे जातोय, याचा विचार आता आपण करायला हवा, असंही त्यांनी म्हटलं. ते जम्मू काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभात बोलत होते.
'देशामध्ये अशी घटना घडणं अतिशय लज्जास्पद आहे. आपण कोणता समाज निर्माण करतोय, याचा विचार आता करायला हवा. कोणत्याही मुलीसोबत, महिलेसोबत असा प्रकार घडू नये, याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी,' असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं. याआधी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीदेखील महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केली. 'एवढ्या कमी वयाच्या मुलीसोबत कोणी इतक्या क्रूरपणे कसं काय वागू शकतं?,' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपल्या समाजात काहीतरी चुकीचं घडतंय, असंही त्या यावेळी म्हणाल्या.