मुंबई - दहशतवाद्यांशी संबंध असल्याबद्दल जम्मू-काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेले उप पोलीस अधीक्षक दविंदर सिंग यांच्यावरून काँग्रेस व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काँग्रेसच्या टीकेला उत्तर देताना भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस हिंदुंना दहशतवादी सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असून पाकिस्तानची बाजू घेत आहे. त्यानंतर, आता खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधींनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना प्रश्न विचारला आहे.
२६ जानेवारीला होणाऱ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; ५ दहशतवाद्यांकडून स्फोटके जप्त
भाजप प्रवक्ते संबित पात्रा मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याबद्दल दविंदर सिंग यांना अटक झाली असून कायदा त्याचे काम करीत आहे. परंतु, काँग्रेसचा हातखंडा ज्यात आहे तेच काम तो करीत आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला व तो पाकिस्तानला वाचवण्याच्या प्रयत्नांत आहे, असे पात्रा यांनी म्हटले होते.
दहशतवाद्यांकडून उपअधीक्षकास मिळाले १२ लाख; प्रजासत्ताकदिनी घातपाताचा होता कट
हिज्बुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी व एका कार्यकर्त्यासोबत शनिवारी कुलगाममध्ये अटक करण्यात आलेले पोलीस उपअधीक्षक दविंदरसिंग यांनी या दहशतवाद्यांकडून 12 लाख रुपये मिळाल्याचे चौकशीमध्ये कबूल केले. त्यानंतर, याप्रकरणी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना प्रश्न विचारला आहे. दविंदर यांच्यावर तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्यात यावा. केवळ 6 महिन्यात याचा निकाला लावून दोषीला कठोर शासन करावे, अशी मागणी राहुल यांनी केली आहे. तसेच, याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सुरक्षा सल्लागार अजित डोभाल गप्प का? असा प्रश्नही राहुल त्यांनी विचारला. तर, पुलवामा हल्ल्यात दविंदरने काय भूमिका निभावली? आणि त्यास कुणाचे संरक्षण मिळत आहे? असेही प्रश्न राहुल यांनी विचारले आहेत.
दरम्यान, दविंदर सिंग हे हिज्बुलच्या दहशतवाद्यांना आधी जम्मूला आणि तेथून दिल्लीला जाण्यासाठी चंदीगडला नेणार होते. ही माहिती महानिरीक्षक (काश्मीर) विजय कुमार यांनी सोमवारी सांगितली. या दहशतवाद्यांचा प्रजासत्ताकदिनी हल्ला करण्याचा कट होता. दविंदरसिंग यांना सोमवारी निलंबित करण्यात आले असून, अतिरेकीविरोधी कारवायांसाठी दिले गेलेल्या राष्ट्रपती पदकासह त्यांचे सगळे पुरस्कार काढून घेण्यात आले आहेत. गुप्तचर विभाग, लष्करी गुप्तचर खाते, रॉ आणि पोलिसांनी दविंदरसिंग यांची चौकशी केली आहे.