लखनौ - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो नुकताच व्हायरल झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये पुढच्या काही महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या फोटोची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तसेच या छायाचित्रावरून विरोधी पक्षांनी खूप टीकाही केली होती. मात्र मोदींनी योगींच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना नेमकं काय सांगितलं, असेला असा प्रश्न सर्वांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि संरक्षणमंत्र राजनाथ सिंह यांनी दिलं आहे.
सीतापूरमध्ये उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, सध्या जे छायाचित्र विरोधकांमध्ये सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना काय सांगत आहेत हे मी तुम्हाला सांगतो. मोदी योगींना सांगितले की तुम्ही धडाकेबाज फलंदाजी करत राहा. राज्यातील आधीची कायदेव्यवस्था आणि विकासाच्या स्थितीची आताच्या परिस्थितीशी तुलना करत राजनाथ सिंह यांनी योगींचे कौतुक केले आणि ते एखाद्या धडाकेबाज फलंदाजासारखी फलंदाजी करत आहेत, असे सांगितले. यादरम्यान राजनाथ सिंह म्हणाले की, तुम्ही सर्वांनी एक फोटो पाहिला असेल. मोदी योगींना काय सांगत आहे, याबाबत विचार करून काही लोक त्रस्त होत आहेत. आता मी सांगतो की मोदीजी मुख्यमंत्री योगींना काय सांगत आहेत ते, मोदी सांगत आहेत की, अशीच धडाकेबाज फलंदाजी करत जा.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो समोर आल्यानंतर विरोधी पक्षांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली होती. मनात नसतानाही खांद्यावर हात ठेवून काही पावले सोबत चालावे लागते, असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला होता. तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फोटो शेअर करून सारे काही आलबेल आहे, असे दाखवावे लागत आहे, असा टोला काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी लगावला होता.