काही दिवसांपूर्वीच जी २० परिषदेची सांगता झाली आणि आता त्यावेळी घडलेल्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. आज चीनबाबत एक खळबळजनक खुलासा झाला आहे. जिनपिंग यांनी स्वत: बैठकीला न येता हेरगिरीसाठी जासूस पाठविले होते असे समोर येत आहे. चीनचे प्रतिनिधी दिल्लीच्या ताज पॅलेसमध्ये सर्व्हिलान्स डिव्हाईस घेऊन आल्याचे समोर आले आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्याने बॅगेत कसलीतरी उपकरणे पाहिली आणि चिन्यांचे बिंग फुटले आहे.
राजनैतिक नेत्यांना, अधिकाऱ्यांना काही सवलती मिळत असतात. याचाच फायदा चीनने उचलला होता. हॉटेलमध्ये प्रवेश करताना चीनच्या पंतप्रधानांसोबत एक भली मोठी बॅग होती. नियमाने ठरवून दिल्यापेक्षा जास्त आकाराची असली तरी सुरक्षा रक्षकांनी ती रोखली नव्हती. ती चिनी लोकांना राहण्यास दिलेल्या रुममध्ये जाऊ दिली. परंतू, त्या रुमबाहेर तीन गार्ड तैनात ठेवण्यात आले होते.
भारताने ते चिनी डेलिगेट्स असल्याने पूर्ण खबरदारी घेतली होती. चीनने या डेलिगेट्ससाठी या रुममध्ये वेगळे इंटरनेट कनेक्शन मागितले होते. परंतू, भारताने ते नाकारले होते. तसेच एजन्सी अलर्ट मोडवर ठेवण्यात आली होती. राजनैतिक प्रोटोकॉल असल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणेचे हात बांधलेले होते. परंतू, रुममध्ये सर्व्हिस देण्यासाठी गेलेल्या हॉटेलच्या कर्मचाऱ्याने त्या बॅगमध्ये कोणतीतरी उपकरणे पाहिली आणि त्याला संशय आला. त्याने ते लगेचच भारतीय सुरक्षा दलांना सांगितले.
सुरक्षा रक्षकांनी चिनी डिप्लोमॅटना ती बॅग स्कॅन करण्यास सांगितले, परंतू चिनी अधिकारी त्यासाठी तयार झाले नाहीत. त्यामुळे बाहेरून लक्ष ठेवणे हेच सुरक्षा एजन्सींच्या हातात होते. हे जवळपास १२ तास सुरु होते. अखेर काहीच करता येत नाहीय हे पाहून चिनी डिप्लोमॅट्सनी ती बॅग चीनच्या दिल्लीतील दुतावासात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तसे कळविले. परंतू, भारतीय यंत्रणांना अखेरपर्यंत त्या बॅगमध्ये काय होते, हे समजू शकलेले नाही. असे असले तरी हॉटेल कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे खूप मोठा अनर्थ भारताला टाळता आला आहे.