'नेहरु-गांधी कुटुंबीयांना टार्गेट करण्यापेक्षा 5 वर्षात काय केलं ते सांगा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 03:23 PM2019-04-24T15:23:14+5:302019-04-24T15:25:03+5:30
फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. मात्र पाच वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातील अर्ध्यापेक्षा जास्त वेळ गांधी आणि नेहरु परिवारावर टीका करण्यात घालवतात. नरेंद्र मोदींचे भाषण गांधी कुटुंबावर केंद्रीत असते. फक्त इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरु यांच्यावर टीका करतात. मात्र पाच वर्षात काय केलं हेच सांगत नाहीत अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सीकरीमध्ये प्रियंकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. फतेहपूर सीकरीमध्ये काँग्रेसची जाहीर सभा झाली. या सभेत प्रियंका गांधी बोलत होत्या.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले तर 50 टक्के भाषण नेहरुंनी हे केल, इंदिरा गांधींनी ते केलं. मात्र भाजपाच्या 5 वर्षात सत्तेच्या काळात मोदी सरकारने काय केलं हे सांगत नाही असा टोला प्रियंका गांधी यांनी मोदींना लगावला. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी प्रचार केला जात आहे. उत्तर प्रदेशातील 13 जागांवर चौथ्या टप्प्यात मतदान पार पडेल. यामध्ये खीरी, शाहजहापूर, हरदोई, कानपूर, कन्नोज यासारख्या मतदारसंघाचा समावेश आहे.
प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्य करत आहेत. इतकचं नाही तर वाराणसी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघातून काँग्रेसकडून प्रियंका गांधी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. अद्याप काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांच्या उमेदवारीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. मात्र जर पक्षाने तिकीट दिलं तर वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास मी तयार आहे असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मात्र वाराणसी लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या हातात आहे.
प्रियंका गांधी यांना काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची निवड झाल्यानंतर त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशातील मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तेव्हापासून प्रियंका गांधी या अनेक प्रचार रॅली, गंगा यात्रा अशा माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करत आहे. फतेहपूर जिल्ह्यात येण्यापूर्वी प्रियंका गांधी ह्या राहुल गांधी यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात आणि सोनिया गांधी यांच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघात दौऱ्यावर होत्या. याठिकाणी कार्यकर्त्यांशी बोलून निवडणूक प्रचाराचा आढावा प्रियंका गांधी यांनी घेतला आहे.