तुम्ही अनेक विसराळू लोकांबद्दल ऐकले असेल. मात्र, कोणी १५ लाख रुपयांचा धनादेश कॅबमध्ये विसरू शकतो काय? होय, असे बहाद्दरही आहेत. एका कॅब सेवापुरवठादार कंपनीने देशभरात केलेल्या सर्व्हेत ही बाब समोर आली. या कंपनीने ‘लॉस्ट अॅण्ड फाऊंड इंडिया इंडेक्स’ या नावाने यादी जाहीर केली असून, त्यात लोक कॅबमध्ये काय काय विसरतात याची माहिती देण्यात आली आहे. या यादीत काही नेहमी विसरणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. मात्र, काही लोक टॅक्सीत अशा काही गोष्टी विसरले आहेत जे ऐकून तुम्हाला खरे वाटणार नाही. मोबाईल फोन, फोनचे चार्जर, चावी, पाकीट, पर्स किंवा बॅग, चष्मा या गोष्टी लोकांकडून नेहमीच विसरून राहतात. मात्र, एका बहाद्दराचा १५ लाख रुपयांचा चेक विसरून राहिला, तर दुसरा लाडक्या कुत्र्यालाच कॅबमध्ये विसरला. कॅबमध्ये विसरून राहिलेल्या वस्तूत महागडे घड्याळ, महागडे बूट, की-बोर्ड, दारूच्या बाटल्या, क्रिकेट बॅट, किराणा सामानाची पिशवी तसेच पानकोबीचाही समावेश आहे.कॅबमध्ये वस्तू विसरण्यात बंगळुरूचे लोक सर्वात पुढे आहेत. त्यानंतर दिल्लीकरांचा क्रमांक लागतो. विसराळुपणात मुंबई तिसऱ्या, हैदराबाद चौथ्या, तर कोलकाता पाचव्या क्रमांकावर आहे. लोक सर्वाधिक वस्तू शनिवारी आणि रविवारी टॅक्सीत विसरतात. कॅबमध्ये वस्तू विसरल्याच्या सर्वाधिक घटना ३१ डिसेंबर रोजी घडल्या. ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. जिकडेतिकडे उत्सवाचे वातावरण. अशावेळी वस्तू विसरणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आता कॅब केल्यानंतर उतरताना सर्व वस्तू घेतल्या ना, याची खात्री करून घ्या.
कॅबमध्ये लोक काय काय विसरतात
By admin | Published: April 10, 2017 12:46 AM