विरोधकांकडे कोणत्या मुद्द्यांचे शस्त्र? बीआरएस सरकारविरोधात भाजप-काँग्रेसचा आक्रमक प्रचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 06:21 AM2023-10-23T06:21:24+5:302023-10-23T06:22:05+5:30
बीआरएसचा विकासाच्या मॉडेलवर भर
समीर परांजपे, हैदराबाद : तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या फुटलेल्या प्रश्नपत्रिका, मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या व भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) आमदार के. कविता यांच्यावर दिल्ली मद्य घोटाळ्यासंदर्भात झालेले आरोप अशा अनेक विषयांवर आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये विरोधक बीआरएसवर हल्लाबोल करणार आहेत. तर, केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणाच्या विकासात खो घातला, आम्हाला आवश्यक तितका निधी केंद्राने दिला नाही असा भारत राष्ट्र समितीचा आरोप आहे. तर, तेलंगणात काँग्रेस भाजपची सी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप बीआरएसने केला आहे.
‘बीआरएस बी टीम नव्हे, तर काँग्रेस भाजपची सी टीम’
तेलंगणाचे मंत्री के.टी. रामाराव यांनी टीका केली की, बीआरएस ही भाजपची बी टीम नसून, काँग्रेस ही भाजपची सी म्हणजे ‘चोर’ टीम आहे. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या वेळेस काँग्रेसचे महत्त्वाचे नेते त्या राज्यात फारसे प्रचाराला गेले नाहीत. यामागचे कारण काय आहे?
काँग्रेसला वस्तुनिष्ठ माहिती नाही : बीआरएस
तेलंगणात जलसिंचन प्रकल्पामध्ये १ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला होता. पण, या राज्यात जलसिंचन प्रकल्प उभारणीचा खर्च ८० हजार कोटी रुपयांचा झाला असताना त्यापेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार कसा होईल, असा सवाल बीआरएसने केला आहे. काँग्रेसला तेलंगणाबद्दल काहीही वस्तुनिष्ठ माहिती नाही हे त्यांनी केलेल्या आरोपांतून दिसते, असे बीआरएसने म्हटले आहे.
‘तेलंगणा मॉडेल’वर बीआरएसचा भर
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात ‘तेलंगणा मॉडेल’वर भर देणार आहे. आमच्या सरकारने तेलंगणाचा उत्तम विकास केला, असा दावा या पक्षाच्या प्रचारात केला जाईल.
भाजप-काॅंग्रेसने काय आरोप केले?
तेलंगणामध्ये बेकारीचे प्रमाण मोठे असून, बीआरएसने युवकांची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजप व काँग्रेस सातत्याने करत आहेत. तेलंगणातील जमिनींच्या नोंदणीसाठी राज्य सरकारने धरणी ॲप सुरू केले. मात्र, ॲपमधील त्रुटींमुळे जमिनीच्या नोंदणीमध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचे आरोप विरोधकांनी केले आहेत. सरकारच्या विरोधातील प्रचारात धरणी ॲपचा मुद्दा प्रकर्षाने मांडला जाईल.
भाजपच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते
भाजप व काँग्रेसला तेलंगणामध्ये काहीही स्थान नाही. राज्यात गेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपच्या उमेदवारांनी १०५ मतदारसंघांमध्ये डिपॉझिट गमावले होते. केंद्रातील भाजप सरकारने तेलंगणाला नेहमी सापत्न वागणूक दिली आहे. भाजपची तेलंगणात फारशी ताकद नाही. केंद्रातील सरकारच्या बळावर भाजप बीआरएस सरकारला दडपू शकत नाही, असेही बीआरएसने म्हटले आहे.