नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे रुग्णांवर खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या वसुलीवरुन रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र संताप आहे. हैदराबादमध्ये तर चक्क एक पॉझिटीव्ह डॉक्टरकडूनच अव्वाच्या सव्वा फी आकारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या डॉक्टराने एवढे अवाढव्य बिल भरण्यास नकार दिल्यानंतर, संबंधित डॉक्टरला रुग्णालय प्रशासनाने बंदी बनवून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित महिला स्थानिक रुग्णालयात नगरपालिका आरोग्य अधिकारी आहे.
महिला आरोग्य अधिकारी असलेल्या या डॉक्टरकडे केवळ 1 दिवसांचा खर्च म्हणून तब्बल 1.15 लाख रुपयांचे बिल बनवून रक्कम वसुल करण्यात आल्याचा आरोप या डॉक्टरने महिलेने केला आहे. या संवादाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे योग्य उपचाराविनाच या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे, कोरोना पॉझिटीव्ह असूनही सध्या पीडित महिला घरीच आपल्यावर उपचार करत असल्याचे व्हिडिओत म्हटले आहे.
1 जुलैच्या रात्री उशिरा संबधित महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे, त्यांनी स्वत:ला खासगी रुग्णालयात दाखल केले. या महिलेने व्हिडिओत दावा केला आहे की, मी एक कोविड योद्धा आहे. मात्र, या रुग्णालयाकडून मला एका दिवसाचे बिल तब्बल 1.15 लाख रुपये देण्यात आले आहे. मी एवढी मोठी रक्कम भरू शकत नसल्याने मी 40 हजार रुपये भरले. मात्र, रुग्णालया प्रशासनाने मला येथेच बंद करुन ठेवले. मला मधुमेहाचा त्रास आहे, तरीही या रुग्णालयाने माझ्यावर योग्य तो उपचार केला नसल्याचा आरोपही या डॉक्टर महिलेने केला आहे.
यासंदर्भात खासगी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. के. के. शंकर म्हणाले की, संबंधित महिला डॉक्टर ह्या 4 दिवसांपूर्वीच कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्या होत्या. मात्र, त्यांनी घरीच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले. त्यानंतर, त्यांनी सरकारी रुग्णालयात माहिती न देताच, खासगी रुग्णालयात स्वत:ला दाखल केले. त्यामुळे, त्यांच्या मोफत उपचाराची सोय झाली नाही. यासंदर्भात, वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून याप्रकरणात लक्ष देण्याची विनंती केल्याचंही शंकर यांनी स्पष्ट केलंय.