ई-श्रम कार्ड देशभरात स्वीकारार्ह असेल. नोंदणीनंतर कामगारांना अपघात विम्याची सुविधा प्राप्त होईल. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरता अपंगत्व आल्यास १ लाख रुपये तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपयांचे विमाकवच लाभणार आहे. त्यातच भविष्यात असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभही मिळणार आहेत.
कोण पात्र असणार?
ई-श्रम पोर्टलवर शेतकरी नोंदणी करू शकणार की नाही, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. या ठिकाणी केवळ शेतमजूर आणि भूमिहीन शेतकरीच नोंदणी करू शकतात. सधन शेतकरी वा ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शेतजमिनी आहेत, त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येत नाही.
कुठे करता येणार नोंदणी?
ऑनलाइन नोंदणीसाठी कामगार ई-श्रम मोबाइल ॲप वा संकेतस्थळाचा वापर करू शकतात.तसेच सामान्य सुविधा केंद्र, राज्य सेवा केंद्र, कामगार सुविधा केंद्र आणि पोस्ट ऑफिसचे डिजिटल सेवा केंद्र इत्यादी ठिकाणीही नोंदणी करता येऊ शकते. नोंदणीनंतर असंघटित क्षेत्रातील कामगारांना एक युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) आणि एक ई-श्रम कार्ड दिले जाते. यूएएन देशभरात स्वीकारार्ह असते सामाजिक सुरक्षेसाठी कामगारांना वेगवेगळ्या ठिकाणी नोंदणी करण्याची गरज भासत नाही.
मिळणार या सुविधा
असंघटित क्षेत्रातील कामगारांना या योजनेत नाव नोंदणी करण्यासाठी उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही. १६ ते ५९ या वयोगटातील कोणताही असंघटित क्षेत्रातील कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्यांच्याकडे आधार कार्डाशी जोडलेला मोबाइल नंबर नसेल तर अशांना नजीकच्या सीएससी सेंटरवर जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
आतापर्यंत किती लोकांनी केली नोंदणी?
ई-श्रम पोर्टलवर रोज मोठ्या संख्येने कामगार नोंदणी करत आहेत.आतापर्यंत २१ कोटींहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे.गेल्या वर्षी २६ ऑगस्ट रोजी हे पोर्टल सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच एवढ्या मोठ्या संख्येने नोंदणी झाली आहे.