काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत शीख समाजासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपमधील शीख नेते राहुल गांधी यांच्या शीख समाजासंदर्भातील वक्तव्यावरून त्यांना न्यायालयात खेचण्याची धमकी देत आहेत. या मुद्द्यावरून भाजपने राहुल गांधी यांना निशाण्यावर घेतले आहे.
यासंदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले, लोकसभेतील विरोधी पक्षनेते परदेशात 'संवेदनशील मुद्द्यांवर' भाष्य करत 'धोकादायक कथा' पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल यांच्या टिप्पण्या 'भयानक' आहेत. कारण त्यांनी परदेशात राहणाऱ्या शीख समुदायाच्या सदस्यांमध्ये खोटे पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.
परदेशात खोट्या गोष्टी पसरतवत आहेत राहुल गांधी - भाजप नेते हरदीप सिंग पुरी म्हणाले, शिखांच्या पगडी आणि काड्यांसंदर्भात त्यांनी (राहुल गांधी) केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. राहुल गांधी सध्या राष्ट्रीय अस्मिता, एकता आणि विविधता यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर विधाने करत आहेत. एवढेच नाही तर, हे अत्यंत भयानक आहे की, राहुल गांधी माझ्या समाजातील लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, जे कठोर परिश्रम आणि प्रामाणिकपणे अमेरिकेत आपला उदरनिर्वाह करत आहेत.
...तर राहुल यांना विरोधात खटला भरणार -भाजप प्रवक्ता आरपी सिंग यांनी मंगळवारी राहुल गांधी यांना भारतात शीख समाजासंदर्भातील विधानाचा उनरुच्चार करण्याचे आव्हान दिले. आपण त्यांना न्यायालयात खेचू. आरपी सिंग म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात 1984 च्या दंगलीत दिल्लीत 3000 शीख मारले गेले होते. दिल्लीत 3000 शीखांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पगड्या काढण्यात आल्या होत्या. त्याचे केस कापण्यात आले होते आणि दाढीही करण्यात आली होती. ते (राहुल गांधी) हे सांगत नाहीत की, तेव्हा ते (काँग्रेस) सत्तेत होते. एवढेच नाही तर, मी राहुल गांधींना आव्हान देतो की त्यांनी भारतात शीखांबद्दल जे बोलत आहेत त्याचा पुनरुच्चार करावा. यानंतर मी त्यांच्यावर खटला दाखल करून त्यांना न्यायालयात खेचेन, असेही आरपी सिंग यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले होते राहुल गांधी? - वॉशिंग्टनच्या व्हर्जिनिया उपनगरातील हर्नडॉन येथे भारतीय अमेरिकन समुदायाच्या शेकडो लोकांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) काही धर्म, भाषा आणि समुदायांना इतरांच्या तुलनेत निकृष्ट मानतो. भारतात राजकारणासाठी नाही, तर याच गोष्टीसाठी लढई सुरू आहे.
राहुल म्हणाले, आपल्याला सर्वप्रथम हे समजून घ्यावे लागेल की, लढाई कशाच्यासंदर्भात सुरू आहे. लढाई राजकारणाची नाही. तर, एका शीख व्यक्तीने भारतात पगडी अथवा कडे घालावे की नाही, एक शीख म्हणून ती व्यक्ती गुरुद्वाऱ्यात जाऊ शकते की नाही. यासाठी लढाई आहे आणि ही केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर सर्व धर्मांसाठी आहे. सध्या राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत.