लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मृत्यूच्या दाखल्यावर ‘ऑक्सिजनअभावी मृत्यू’ हे कारण कधीच लिहिले जात नाही. ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयक्रिया बंद पडू शकते. काहीवेळा रुग्णांना अन्य व्याधी असतात. त्यांचा उल्लेख मृत्यूचा कारणांत केला जातो. त्यामुळेच कोरोनाच्या एकाही रुग्णाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाही, असे राज्य व केंद्र सरकार सांगत आहे.
या मुद्द्यावर काँग्रेस, आप सरकारविरोधात संसदेत हक्कभंग प्रस्ताव सादर करणार आहे. ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झालेला नाही, असे सरकार सांगते, त्याला आणखी काही कारणे आहेत. आरोग्य हा राज्य सरकारच्या अख्यत्यारितला विषय आहे. कोरोना लसीकरण, संसर्गाने झालेले मृत्यू किंवा रुग्णांच्या आकडेवारीबद्दलची राज्यांनी दिलेली माहिती गोळा करून ती प्रसिद्ध करणे इतकेच काम याबाबत केंद्राच्या हाती आहे.
पुरवठ्यातील विस्कळीतपणा दूर करा
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)चे माजी अध्यक्ष व एका खासगी रुग्णालयाच्या संचालकांनी आपले नाव उघड न करता सांगितले की, एखादा रुग्ण हृदयविकाराने मरण पावला असेल, तर त्याचा मृत्यू ऑक्सिजनअभावी झाला, असे नमूद करता येणे शक्यच नाही. ऑक्सिजनअभावी काहीजण मरण पावले, असे गृहित धरले, तर या वायूच्या पुरवठ्यामधील विस्कळीतपणा टाळून मृतांचे प्रमाण कमी करता आले असते, असेही या वैद्यकीय तज्ज्ञाने म्हटले आहे.