चेन्नई- तामिळनाडूतील सुमारे 40 जागांवर सीबीआयने आज छापे टाकले आहेत. गुटखा घोटाळ्याचा तपास करण्यासाठी हे छापे टाकले आहेत. यामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर आणि पोलीस महासंचालक टी.के. राजेंद्रन यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे माजी पोलीस आयुक्त एस, जॉर्ज यांच्या निवासस्थानीही छापा टाकला आहे. हे सर्व नेते आणि अधिकारी बेकायदेशीररित्या गुटखा विक्री केल्याच्या प्रकरणात सीबीआयच्या रडारवर आहेत.2013 साली तामिळनाडूमध्ये तंबाखूजन्य उत्पादने, गुटखा आणि पान मसाला यांच्यावर बंदी घालण्यात आली होती मात्र तरिही राज्यभरामध्ये बेकायदेशीररित्या त्याची विक्री सुरुच होती.तामिळनाडूतील एका व्यापाऱ्याने 250 कोटी रुपयांचा कर चुकवल्याच्या संशयावरुव आयकर तपासनिसांनी एका गोदामावर छापा टाकला होता. जुलै 2016मध्ये पहिल्यांदा गुटखा घोटाळ्याचे प्रकरण समोर आले.माधव राव नावाच्या पान मसाला आणि गुटखा उद्योजकाच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्याच्याकडील डायरी जप्त करण्यात आली. या डायरीमध्ये काही राजकारणी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या कथित नोंदी होत्या. त्यामुळे एप्रिल महिन्यात द्रमुकचे नेते जे. अनबलगन यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने हे प्रकरण एप्रिल महिन्यात सीबीआयकडे सोपवले. मे महिन्यामध्ये सीबीआयने तामिळनाडू सरकारच्या अधिकाऱ्याविरोधात तसेच केंद्रीय अबकारी विभाग आणि अन्न सुरक्षा विभागाविरोधात एफआयआर दाखल केला.
तामिळनाडूतील गुटखा घोटाळा नक्की आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 2:26 PM