नवी दिल्ली - काश्मीरच्या प्रश्नावर नक्की मोदी सरकारच्या मनात काय चाललंय? याचं उत्तर काही तासांत समजणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सकाळी 9.30 वाजता आहे. या बैठकीत काश्मीर खोऱ्यातील प्रश्नावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत घेतलेला निर्णय आणि काश्मीरमधील सध्याची परिस्थिती यावर सरकार संसदेत उत्तर देणार आहे.
काश्मीरमध्ये होणाऱ्या हालचाली आणि रविवारी मध्यरात्री काश्मीरमधील नेते माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरबंद करण्यात आलं आहे. तर रात्री उशीरा राज्यपालांनी डीजीपी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. रविवारी रात्रीपासून काश्मीरमधील हालचालींना वेग आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृह सचिव यांच्यासमावेत गुप्तचर खात्याचे अधिकारीही उपस्थित होते. संपूर्ण परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला जात आहे. डोवाल यांना पत्रकारांनी काश्मीर प्रश्नावर विचारताच त्यांनी हसत हसत निघून गेले.
सूत्रांच्या माहितीनुसार सरकार संसदेचं अधिवेशन 2 दिवस आणखी वाढवू शकते. ज्यामध्ये सध्याच्या स्थितीवर चर्चा होऊ शकते. पुढील आठवडण्यात शहा काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याबाबत राज्यातील नेत्यांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील वातावरण पेटले आहे.
संपूर्ण राज्यात सुरक्षेच्या यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. लखनपूरपासून काश्मीरच्या घाटीपर्यंत प्रत्येक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नजर ठेऊन आहेत. मिडीया रिपोर्टनुसार आतापर्यंत काश्मीरमध्ये जवानांच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद आहे. मात्र त्याआधी नजरकैदेत असलेल्या अब्दुल्ला आणि मुफ्तींनी ट्विट्स केली. लवकरच इंटरनेट सेवा खंडित होणार असल्याचं समजतं आहे. संचारबंदीदेखील लागू केली जात आहे. काय होणार आहे, अल्लाह जाणे. एक मोठी रात्र सुरू होत आहे. या कठीण काळात आपण सोबत राहायला हवं आणि जे होईल त्याचा एकत्रितपणे सामना करायला हवा, असं मुफ्तींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं. मुफ्तींचं हे ट्विट ओमर अब्दुल्लांनी रिट्विट केलं आहे.