Parliament Session 2024: लोकसभा निवडणुकीनंतर आजपासून (दि.24) 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात झाली. विरोधकांची पॉवर वाढल्यामुळे हे अधिवेशन पहिल्या दिवसापासूनच वादळी ठरत आहे. विरोधक विविध मुद्द्यांवरुन सरकारला कोंडीत पकडण्याच्या तयारीत आहेत. अशातच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
राहुल म्हणतात, ''मानसशास्त्रीयदृष्ट्या नरेंद्र मोदी बॅकफूटवर असून, आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने संविधानावर केलेला हल्ला आम्हाला मान्य नाही आणि आम्ही हे कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. प्रबळ विरोधक म्हणून आम्ही दबाव कायम ठेऊ आणि पंतप्रधानांना जबाबदारीपासून पळू देणार नाही.''
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये गेल्या 15 दिवसातील महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला. ''एनडीएचे पहिले 15 दिवस! 1- भीषण रेल्वे अपघात. 2- काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले 3- ट्रेनमधील प्रवाशांची दुर्दशा. 4- NEET घोटाळा. 5- NEET PG रद्द 6- UGC NET चा पेपर लीक. 7- दूध, डाळी, गॅस, टोल महाग. 8- जळणारी जंगले. 9- जलसंकट. 10- उष्णतेच्या लाटेत व्यवस्था नसल्यामुळे मृत्यू,'' अशी टीका राहुल यांनी केली.
काँग्रेस अध्यक्षांची टीकाकाँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीदेखील सोशल मीडिया पोस्टद्वारे पीएम मोदींवर जोरदार टीका केली. "मोदीजी महत्त्वाच्या मुद्द्यांवर काहीतरी बोलतील, अशी देशाला आशा होती. NEET आणि इतर भरती परीक्षांमधील पेपरफुटीवर बोलतील, अशी आशा होती. पण, त्यांच्या सरकारच्या हेराफेरी आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांनी कोणतीही जबाबदारी घेतली नाही. पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताबाबतही मोदींनी मौन बाळगले. मणिपूर गेल्या 13 महिन्यांपासून हिंसाचाराच्या विळख्यात आहे, पण मोदीजी तिथे गेले नाहीत किंवा त्यांच्या आजच्या भाषणात हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली नाही. आसाम आणि ईशान्येत पूर येऊ शकतो, महागाई वाढू शकते, रुपयाची घसरण होऊ शकते, एक्झिट पोल-स्टॉक मार्केट घोटाळा आणि जात जनगणना, अशा कोणत्याही मुद्द्यावर मोदीजी पूर्णपणे मौन बाळगून होते," अशी टीका त्यांनी केली.