ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 2 - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांचा मृत्यू नैसर्गिक नसून, त्यामागे घातपात आहे. जयललिता पोस गार्डन येथील आपल्या निवासस्थानी असताना कोणीतरी त्यांना धक्का मारुन खाली पाडले. त्यानंतर त्यांना 22 सप्टेंबरला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असा आरोप अण्णाद्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे माजी विधानसभाध्यक्ष पी.एच.पांडीयन यांनी गुरुवारी केला.
कोणीतरी अम्मांना धक्का मारुन खाली पाडले. त्यानंतर त्यांच्याबरोबर काय झाले कोणालाही माहिती नाही. पोलिस अधिका-यांनी रुग्णावाहिका बोलावली आणि त्यांना रुग्णालयात नेले असे पांडीयन यांनी पत्रकारांना सांगितले. माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
जयललिता यांना अॅडमिट केल्यानंतर अपोलो रुग्णालयातील 27 सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकण्यात आले. असे का करण्यात आले ? त्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने स्पष्टीकरण दिले पाहिजे. 4 डिसेंबरला संध्याकाळी 4.30 वाजता जयललिता यांचा मृत्यू झाला. पण रुग्णालयाने 4 डिसेंबरला जयललितांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
जयललिता यांच्यावरील उपचार थांबवण्याची परवानगी कुटुंबातल्या कुठल्या सदस्याने दिली त्याचे नाव समजले पाहिजे असे पांडियन म्हणाले. अम्माला देण्यात आलेल्या उपचारांबद्दलही संशय आहे. मुख्यमंत्री असल्याने त्यांना एसपीजीचे सुरक्षाकवच होते. एसपीजी कायद्यानुसार अम्मांसाठी बनवण्यात येणारे जेवण तपासण्यात येत होते का ? असे अनेक प्रश्न पांडियन यांनी विचारले आहेत.