चेन्नई : दक्षिण भारतातील राजकारणामध्ये एम. करुणानिधी यांच्या कार्याचा मोठा वाटा आहे. वयाच्या 14 व्या वर्षांपासून करुणानिधी यांनी राजकारणात प्रवेश केला, त्यानंतर आयुष्याचा पुढील सर्व काळ त्यांनी याच क्षेत्रात व्यतित केला.
1) जस्टीस पार्टीचे नेते अळगिरीस्वामी यांच्या भाषणाने प्रभावित झाल्यावर करुणानिधी यांनी राजकीय चळवळीमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. हिंदी भाषेच्या आक्रमणाविरोधात त्यांनी कार्य सुरु केले. त्यांनी स्थानिक तरुणांची एक संघटना स्थापन करुन एका 'मनवर नेसान' नावाने एक हस्तलिखित वर्तमानपत्राचे वितरण सुरु केले.
2) त्यानंतर त्यांनी तमिळनाडू मनवर मंद्रम नावाची एक विद्यार्थी संघटना सुरु केली. द्रविड चळवळीच्या विद्यार्थी शाखेचं काम करणारे ते पहिले विद्यार्थी होते. याबरोबर करुणानिधी यांनी समाजकार्याशी व विविध संघटनांशी स्वतःला जोडून घेतलं. यानंतर त्यांनी एका वर्तमानपत्राची स्थापना केली. आज त्यामध्ये बदल होत मुरासोली नावाचे वर्तमानपत्र तयार झाले आहे. द्रमुक पक्षाचे ते अधिकृत मुखपत्र आहे.
3) 1953 साली कल्लाकुडी प्रकल्पामुळे करुणानिधी एकदम वेगाने राजकारणाच्या पटलावर अवतरले. कल्लाकुडीचे नाव येथील सिमेंट कारखान्यामुळे दालमियापूरम करण्यात आले होते. त्याला स्थानिकांनी विरोध केला तसेच द्रमुकनेही त्याला विरो केला होता. या विरोध आंदोलनात दोन लोकांचे प्राण गेले आणि करुणानिधी यांना अटक करण्यात आली होती.
4) 1957 साली द्रमुक पक्षातर्फे निवडणूक लढवून करुणानिधी तामिळनाडू विधानसभेत गेले. 1961 साली ते द्रमुकचे कोशाध्यक्ष झाले आणि विधानसभेत विरोधीपक्षाचे उपनेतेपद मिळाले.
5) 1967 साली ते तामिळनाडू सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री झाले. 1969 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. अण्णादुराई यांचा वारसा ते चालवू लागले.