नवी दिल्ली - भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांचे तामिळनाडूमधील किन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या भीषण अपघातात बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेमध्ये या अपघाताच्या घटनाक्रमाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
राजनाथ सिंह यांनी लोकसभेमध्ये सांगितले की, आज सभागृहाला अत्यंत दु:खद अंत:करणाने सांगू इच्छितो की, ८ डिसेंबर रोजी दुपारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपिन रावत हेही उपस्थित होते. जनरल बिपिन रावत यांना वेलिंग्टनमध्ये डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये जात होते. त्यांना घेऊन हवाई दलाच्या एमआय १७ हेलिकॉप्टरमधून ते सुलूर एअरबेसमधून ११ वाजून ४८ मिनिटांनी उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर १२ वाजून १५. मिनिटांनी हे हेलिकॉप्टर वेलिंग्टनमध्ये उतरणार होते. मात्र तत्पूर्वीच १२ वाजून ८ मिनिटांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला.
अपघात झाल्यानंतर काही स्थानिक लोकांनी जंगलामध्ये आग पाहिली. त्यानंतर त्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली आणि अपघातग्रस्त हेलिकॉप्टरकडे पोहोचले. त्यानंतर बचाव पथकही तिथे पोहोचले. त्यांनी सर्वांना अपघातस्थळावरून वेलिंग्टनच्या लष्करी रुग्णालयात नेले. आतापर्यंतच्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असलेल्या १४ पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सीडीएस बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, लष्करी सल्लागार ब्रिगेडियर लिड्डर, स्टाफ ऑफिसर लेफ्टिनंट कर्नल हरजिंदर सिंह आणि ९ अन्य लष्करी संरक्षण दलांचे जवान होते. दरम्यान, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे लाईफ सपोर्टवर असून, त्यांच्यावर वेलिंग्टनमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.
या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या अपघाताची चौकशी होणार आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि अन्य सर्वांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. मी सभागृहाच्यावतीने सीडीएस बिपिन रावत आणि अन्य सर्वांना श्रद्धांजली देतो, असे सांगत राजनाथ सिंह यांनी रावत यांना श्रद्धांजली वाहिली.