जम्मू-काश्मीर- सुंजवां येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले मेजर अभिजीत शुद्धीवर आले आहेत. शुद्धीवर येताच त्यांनी दहशतवाद्यांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थितांना विचारला आहे. शनिवारी पहाटे जम्मूतील सुंजवां इथल्या लष्करी तळावर लष्कराच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत. लष्कराच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय, हा हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केल्याचं उघड झालं होतं.सुंजवां इथल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर अभिजीत जखमी झाले होते. त्यांच्यावर उधमपूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे शुद्धीत आल्यावर त्यांनी परिवार किंवा इतरांबद्दल काही विचारले नाही. स्वतः हल्ल्यात किती जखमी झाले आहेत, कुठला अवयव तर निकामी झाला नाही ना, अशा प्रकारेच प्रश्न न विचारता थेट दहशतवाद्यांचं काय झालं, असं विचारल्यामुळे त्यांच्या देशप्रेमानं सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. मला आता थोटं बरं वाटतं आहे. मी वारंवार डॉक्टरांशी संवाद साधतो आहे. येत्या दोन दिवसांत मी बसायला आणि चालायला लागेन. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये काय घडतंय, याबाबत मला काहीही कल्पना नाही, असंही मेजर अभिजित म्हणाले आहेत. त्यामुळे सीमा रेषेवर दहशतवाद्यांबरोबरच शेजारील सैन्याशी लढणा-या जवानांची भावना काय असते, हेसुद्धा स्पष्ट झालं आहे.
दहशतवाद्यांचं काय झालं ?, शुद्धीवर येताच मेजर अभिजीत यांनी विचारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 5:22 PM