लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नीट-यूजी २०२४ च्या परीक्षेत कोणाकडूनही ‘०.००१ टक्के निष्काळजीपणा झाला असला तरी, तरी ठोस करवाई व्हायला हवी. या परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतात, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नोंदवले.
राष्ट्रीय पात्रता प्रवेशपरीक्षेशी (पदवी)-२०२४ संबंधित खटल्याला विरोधी मानले जाऊ नये, असेही न्यायालयाने सुनावले. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि एस. व्ही. एन. भाटी यांच्या सुटीतील खंडपीठाने केंद्र आणि राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) यांच्या बाजूने उपस्थित असलेल्या वकिलांना सांगितले की, कोणाच्याही बाजूने ०.००१ टक्के निष्काळजीपणा असला तरीही, त्यावर सखोल कारवाई केली पाहिजे.” ५ मे रोजी झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या वाढीव गुणांसह तक्रारी मांडणाऱ्या दोन स्वतंत्र याचिकांवर खंडपीठात सुनावणी सुरू होती.
- “कल्पना करा की ज्या व्यक्तीने यंत्रणेची फसवणूक केली आहे आणि तो डॉक्टर होतो. ते समाजासाठी अधिक हानिकारक आहे.
- परीक्षा आयोजित करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थांचे प्रतिनिधित्व करताना, तुम्ही खंबीरपणे उभे राहणे आवश्यक आहे. जर काही चूक झाली असेल, तर होय ही एक चूक आहे आणि आम्ही ही कारवाई करणार आहोत, असा दिलासा द्यायला हवा होता.
- कमीत कमी त्यामुळे तुमच्या कामगिरीवरील विश्वास वृद्धिंगत झाला असता,” असे खंडपीठाने एनटीएच्या वकिलांना सांगितले.
नीट परीक्षेतील घोटाळेबाजांवर कारवाई करानीट गैरव्यवहाराची सीबीआय चौकशी करा, परीक्षेतील घोटाळेबाजांवर कारवाई करा, या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरत असून मंगळवारी छत्रपती संभाजीनगर आणि चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चे काढून सरकारचा निषेध केला.
आम आदमी पार्टीची जंतरमंतरवर निदर्शनेराष्ट्रीय पात्रता प्रवेशपरीक्षेत (नीट) कथित अनियमिततेच्या विरोधात आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी जंतरमंतर येथे निदर्शने केली.
काँग्रेस तरुणांसाठी आवाज उठवणारनीट परीक्षेच्या मुद्द्यावर काँग्रेस रस्त्यावर व संसदेत तरुणांचा आवाज जोरदारपणे उठविण्यासाठी कटिबद्ध आहे. बिहार, गुजरात व हरयाणामध्ये झालेल्या अटकेवरून स्पष्टपणे दिसून येते की परीक्षेत नियोजनबद्ध पद्धतीने भ्रष्टाचार झाला आणि ही भाजपशासित राज्ये पेपरफुटीचे केंद्र बनली आहेत.- राहुल गांधी, काँग्रेस नेते
परीक्षेच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या वसमतमधील (जि. हिंगोली) : विद्यानगर भागात दीपिका दौलत खंदारे (१७, रा. आहेरवाडी, ता. पूर्णा, जि. परभणी) या विद्यार्थिनीने नीट परीक्षेच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली.