काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या धाडींमधून आतापर्यंत ३५१ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या धाडीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली की, नोटा मोजताना माणसंच नाही तर मशीनही थकत आहे. प्राप्तिकर विभागाच्या अंदाजानुसार बेहिशोबी पैशांची संपूर्ण रक्कम ही धीरज साहू आणि त्यांच्याशी संबंधित व्यावसायिक समूह, वितरक आणि इतर लोकांकडून देशी दारूच्या रोखीने केलेल्या विक्रीतून जमा करण्यात आली आहे. कुठल्याही यंत्रणेकडून कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली आतापर्यंतची देशातील ही सर्वाधिक रक्कम आहे.
अशा परिस्थितीमध्ये आता जर घरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडली तर ती सरसकट काळा पैसा समजली जाते का? असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मात्र सगळीच रोख रक्कम ही काही काळा पैसा नसते. मात्र बहुतांश प्रकरणांमध्ये काळ्या पैशांचा व्यवहार हा रोखीने होतो. अनेक लोक किंवा व्यावसायिक घरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम ठेवतात. यामध्ये धक्कादायक असं काहीच नाही. जर तुमच्या घरी प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम सापडल्यास सर्वप्रथम तुम्हाला त्या पैशांच्या निर्मितीचा स्रोत सांगावा लागेल. जर असं केलं नाही तर प्राप्तिकर विभाग ही रक्कम जप्त करते. तसेच तुमच्यावर १३७ टक्के दंड ठोठावला जाईल.
तज्ज्ञांच्या मते जी रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यातील ६० टक्के रक्कम कापून घेऊन उर्वरित रक्कम धीरज साहू यांना परत केली जाऊ शकते. मात्र त्यांना हा पैसा कर न भरता मिळवला आहे हे सिद्ध करावे लागेल. मात्र ही रक्कम अवैध मार्गाने गोळा केलेली आहे म्हणजेच आपल्याकडे असलेली रोख रक्कम आणि दागिने हे व्यवसायातून मिळवलेले आहेत, हे साहू सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांच्यावर फौजदारी कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल. तसेच जप्त केलेले पैसेही परत मिळणार नाहीत.
आता धीरज साहू यांच्याकडे जी रक्कम सापडली आहे ती जप्त करून बँकेच्या सेफ कस्टडीमध्ये ठेवली जाईल. त्यानंतर इन्कम टॅक्स ज्यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशांना नोटिस पाठवेल. त्यामध्ये जप्त करण्यात आलेली रोख रक्कम आणि इतर संपत्तीचं विवरण असेल. त्यांना या सर्वांचा सोर्स सांगावा लागेल. तसेच तो सांगण्यासाठी काही दिवसांची मुदत मिळेल. त्यानंतर या उत्तराचं परीक्षण प्राप्तिकर विभाग करेल. जर निकाल साहू यांच्या बाजूने आला नाही तर ते अपिलीय लवादामध्ये अपील करू शकतील.