मेरठ: काहीतरी भव्यदिव्य करण्याच्या नादात मूळ उद्दिष्टालाच कसा हरताळ फासला जातो, याचे प्रत्यंतर नुकतेच मेरठमध्ये आले. याठिकाणी साजऱ्या केल्या जाणाऱ्या नवरात्रीच्या उत्साहात यंदा प्रदूषण मुक्तीसाठी विशेष यज्ञ करण्यात येणार आहे. मात्र, यामधील हास्यास्पद बाब म्हणजे आयोजकांकडून या यज्ञासाठी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 50 हजार किलो लाकूड समिधा म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यामुळे हा यज्ञ प्रदूषण मुक्तीसाठी आहे की अधिक प्रदूषण करण्यासाठी आहे, असा प्रश्न काहीजणांकडून विचारण्यात येत आहे. सध्याच्या घडीला देशातील प्रमुख शहरांमध्ये होणारे प्रदूषण ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी मेरठच्या श्री अयुतचंडी महायज्ञ समितीकडून प्रदूषण मुक्तीच्या उद्देशाने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. वाराणसीतील 350 ब्राह्मण या यज्ञात सहभागी होणार असून नऊ दिवस हा यज्ञ चालणार आहे. यासाठी एका मोठ्या मंडपात अनेक यज्ञकुंडे तयार करण्यात आली आहेत. साहजिकच या यज्ञासाठी मोठ्याप्रमाणावर समिधा लागणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, यासाठी आंब्याच्या झाडाची तब्बल 500 किलो लाकडं या ठिकाणी आणण्यात आली आहेत. प्रदूषण मुक्तीच्या नावाने करण्यात येणाऱ्या या यज्ञामुळे मोठ्याप्रमाणावर हवेचे प्रदूषण होऊ शकते, ही बाब आयोजकांच्या लक्षातच आलेली नाही. यामुळे आता सोशल मीडियावरून या यज्ञाच्या आयोजकांवर टीका व्हायला सुरूवात झाली आहे. गेल्यावर्षी 'लॅन्सेट'ने जाहीर केलेल्या अहवालात, भारतातील वाढते वायू प्रदूषण लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका निर्माण करत असल्याचे म्हटले होते. याशिवाय, काही महिन्यांपूर्वी दिल्लीत प्रदूषणाच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केले होते. त्यामुळे दिल्लीकरांचे जगणे मुश्कील झाले होते. त्यामुळे मेरठमधील हा यज्ञ म्हणजे रोगापेक्षा इलाजच भयंकर, अशी अवस्था असल्याचे टीकाकारांचे म्हणणे आहे.
काय हे! यज्ञ प्रदूषण मुक्तीच्या नावाने... जाळणार 50 हजार किलो लाकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 3:42 PM