रांची - केंद्रीय गृह मंत्रालयाने पाचव्या टप्प्यात ५.० अनलॉक प्रक्रियेसंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यानंतर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थानसह विविध राज्यांत शाळा सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने याबाबत कठोर मार्गदर्शक सूचना केली आहेत. त्यानुसार, शाळा सुरू करण्यासाठी अनेक राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, झारखंडमधील एका शाळेनं लढवलेली शक्कल पाहून, व्हॉट अॅन आयडिया गुरुजी... असंच म्हणावं लागेल.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, शाळांमधील विद्यार्थ्यांना वर्गात येण्यासाठी दबाव आणला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत जाण्यासाठी पालकांची लेखी परवानगीदेखील सर्वात महत्वाची मानली गेली आहे. याशिवाय, शाळा पूर्वीप्रमाणे ऑनलाईन वर्ग सुरू ठेवतील. एवढेच नाही तर केंद्र सरकारने असेही म्हटले आहे की, १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करायच्या की नाही याबाबतचा निर्णय राज्य सरकार आपल्या राज्यातील परिस्थिती आणि तयारीनुसार घेईल. तसेच, राज्य सरकार कोरोना संसर्गाच्या घटनांचा आढावा घेतल्यानंतरच हा निर्णय घेईल. त्यांच्यावर कोणताही दबाव नसणार आहे. त्यामुळे, शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्यापही खात्रीशीर निर्णय होत नाही.
झारखंडमधील एका शाळेत गुरुजींनी लढवलेली शक्कल पाहून सर्वांनाच कौतुक वाटतंय. कारण, विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर करुन या शाळेत धडे दिले जात आहेत. नेहमीच वर्गात भरणारी शाळा, कोरोनामुळे वर्गाबाहेर भरविण्यात आली असून बाहेरील भींतीवरच फळा बनविण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी हा फळा असून सोशल डिस्टन्स पाळून हा अभ्यासवर्ग सुरू आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे विचार आणि आवाज ऐकू येण्यासाठी लाऊड स्पीकरची सोयही करण्यात आली आहे. या शाळेत 200 विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने शिकविण्यात येत आहे. अतुल्य भारतातील हा अमेझिंग शोध असल्याचं उद्योगपती हर्ष गोएंका यांनी म्हटलंय.
हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या शाळेतील विद्यार्थ्यांचा फोटो शेअर करत, या शाळेचं कौतुक केलंय. त्यामुळेच, व्हॉट अॅन आयडिया गुरूजी ... असंच म्हणून या शाळेचं आणि शिक्षकांचं कौतुक करावं लागेल.
शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा गोंधळ कायम
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, राज्य शासनाने विद्यापीठ व महाविद्यालयांना कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे २०२०-२१ शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. यूजीसीने शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबत दोन वेळा मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. त्यानुसार राज्य शासनाने व विद्यापीठाने ऑगस्ट-सप्टेंबरपासून संलग्न महाविद्यालयांना ऑनलाइन वर्ग सुरु करण्याबाबत कळविले. मात्र, यूजीसीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करावे, असे स्पष्ट केले.