गुड फ्रायडे हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. या दिवसाला पवित्र शुक्रवार, चांगला शुक्रवार, काळा शुक्रवार, महा शुक्रवार असेही म्हटले जाते. पण या दिवसाबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमजही बघायला मिळतात. अनेकांना हे माहितीच नसतं की हा एक दु:खाचा दिवस आहे. त्यामुळे काही लोक सोशल मीडियातून या दिवसाच्या शुभेच्छा देतात.
काय आहे महत्व?
भारतामध्ये गुड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्रिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्चमध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
का लटकवलं गेलं येशू ख्रिस्तांना क्रॉसवर?
ख्रिस्ती धर्मानुसार येशू ख्रिस्त हे परमेश्र्वराचे पुत्र होते. लोकांना ते अज्ञानाच्या अंधारातून बाहेर येण्यासाठी शिक्षित करत होते. त्यावेळी काही कट्टरपंथी लोकांनी येशू ख्रिस्तांचा विरोध केला. त्यांनी त्यावेळी रोमन गव्हर्नर पितालुसकडे येशू ख्रिस्तांची तक्रार केली. यहुदी लोकांनी क्रांती करु नये म्हणून आणि त्यांना खूश करण्यासाठी गव्हर्नरने येशु ख्रिस्तांना क्रॉसवर लटकवून जीवे मारण्याचा आदेश दिला.