नवी दिल्ली : काळे धन नेस्तनाभूत करण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या नोटा अचानक बंद करून अस्सल भारतीय असल्याचे सांगत नवीन, छोट्या पण विविधरंगी नोटा चलनात आणल्या. परंतू, या नोटांची छपाई भारतात होत नसून ती विदेशात म्हणजेच चीनमध्ये छापल्या जात असल्याचा अहवाल चीनच्या एका वृत्तपत्रामध्ये आल्याने खळबळ माजली आहे. यावरून काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी केंद्र सरकारकडे खुलासा मागितला आहे.
साधारण दीड वर्षापूर्वी नोटाबंदी करण्यात आली होती. यावेळी 500, 1000 च्या नोटा बंद करून नव्या 500 व थेट 2000 च्या नोटा चलनात आणण्यात आल्या होत्या. यानंतर टप्प्याटप्प्याने 50, 200 आणि 10 च्या नोटाही बदलण्यात आल्या. तसेच पुढील काही दिवसांत 100 ची नोटही चलनात येणार आहे. यावेळी सरकारकडून या नोटांची छपाई भारतात बनलेल्या कागदापासून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या नोटा भारतातील छपाईखान्यांमध्येच छापण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते.
भारतीयांकडून चीनच्या उत्पादनांना होत असलेला विरोधाच्या पार्शभुमीवर चीनच्या वृत्तपत्रात यासंबंधीचा अहवाल छापून आल्याने खळबळ उडाली आहे. या अहवालामध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया, थायलंडसह इतर अनेक देशांचे चलन चीनच्या छपाईखान्यांमध्ये छापले जात असल्याचे म्हटले आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमध्ये हा अहवाल आला आहे. हा अहवाल चीनमधील इतर देशांच्या चलनांची छपाईमुळे तेथील अर्थव्यवस्थेला मिळत असलेल्या गतीवर आहे. या संदर्भात भारत सरकारकडून कोणताही खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.
चीनच्या या वृत्तपत्राने या संदर्भात बैंक नोट प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष लियू गुशेंग यांच्या एका मुलाखतीचा हवाला दिला आहे. 1 मे रोजी दिलेल्या मुलाखतीमध्ये गुशेंग यांनी म्हटले आहे की, 2013 मध्ये चीनमध्ये विदेशी चलन छापण्यास सुरुवात झाली. आता या छपाईखान्यांमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंकेसह मलेशिया, थायलंड, ब्राझील, पोलंडसारख्या देशांची चलने छापली जात आहेत.