नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पी. चिदंबरम यांना सीबीआयने अखेर अटक केली आहे. २७ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर सीबीआयने चिदंबरम यांना त्यांच्या जोरबाग येथील घरातून अटक केली आहे. एअरसेल मॅक्सीसचा व्यवहार 3,500 कोटी रुपयांचा तर आयएनएक्स मिडिया खटल्यात 305 कोटी रुपयांचा संबंध आहे. पी. चिदंबरम हे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये (युपीए-1) अर्थमंत्री असताना विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचा (एफआयपीबी) हिरवा कंदील वरील दोन्ही प्रकरणात दिला गेला होता व त्याचवेळी कथित गैरव्यवहार झाल्यामुळे पी. चिदंबरम यांची त्यातील भूमिका चौकशी यंत्रणा तपासत आहेत. नक्की हे आयएनएक्स मीडिया प्रकरणाचा घटनाक्रम काय आहे हे जाणून घेऊया.
- १५ मे २०१७ - कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयने केला गुन्हा दाखल, एफआयपीबीकडून लाच घेऊन अनियमितता केल्याचा आरोप
- १६ जून २०१७ - केंद्रीय गृहमंत्रालयाने कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली.
- १० ऑगस्ट २०१७ - मद्रास हायकोर्टाने कार्ती चिदंबरम यांच्या लुकआऊट नोटिशीला स्थगिती दिली.
- १४ ऑगस्ट २०१७ - लुकआऊट नोटिशीवर मद्रास हायकोर्टाने दिलेली स्थगिती सुप्रीम कोर्टाने उठविली
- १८ ऑगस्ट २०१७ - सुप्रीम कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना २३ ऑगस्टपर्यंत सीबीआयसमोर हजर राहण्याचे आदेश दिले
- २२ सप्टेंबर २०१७ - सुप्रीम कोर्टात सीबीआयने कार्ती चिदंबरम यांना परदेशात जाण्यापासून रोखावं अशी मागणी केली. ते बँक खात्यातील पुरावे नष्ट करु शकतात असा आरोप सीबीआयने केला.
- ९ ऑक्टोबर २०१७ - सुप्रीम कोर्टाकडे कार्ती चिदंबरम यांनी त्यांच्या मुलीच्या एडमिशनसाठी ब्रिटनला जाण्याची परवानगी मागितली.
- २० नोव्हेंबर २०१७ - सुप्रीम कोर्टाने कार्ती चिदंबरम यांना ब्रिटनला जाण्याची परवानगी दिली.
- ८ डिसेंबर २०१७ - एअरसेल मॅक्सीस व्यवहारात सीबीआय समन्सविरोधात कार्ती यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली.
- १६ फेब्रुवारी २०१८ - कार्ती चिदंबरम यांचे सीए एस. भाष्करमण यांना सीबीआयने अटक केली.
- २० फेब्रुवारी २०१८ - परदेशातून परतल्यानंतर कार्ती चिदंबरम यांना चेन्नई एअरपोर्टवरुन अटक करून दिल्लीला घेऊन जाण्यात आलं.
- २३ मार्च २०१८ - २३ दिवसानंतर कार्ती चिदंबरम यांना जामीन मिळाला
- २५ जुलै २०१८ - हायकोर्टाने पी. चिदंबरम यांना अटकेपासून वाचण्यासाठी अंतरिम जामीन दिला.
- ११ ऑक्टोबर २०१८ - आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग आरोपाखाली ईडीने कार्ती यांची ५४ कोटींची मालमत्ता जप्त केली.
- ११ जुलै २०१९ - इंद्राणी या प्रकरणात सरकारी साक्षीदार बनल्या. इंद्राणीने सांगितले FIPB च्या मान्यतेच्या बदल्यात पी.चिदंबरम यांना पीटर यांना त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना व्यवसायात मदत करण्यास सांगितली.
- २० ऑगस्ट २०१९ - दिल्ली हायकोर्टाने पी. चिदंबरम यांचा अंतरिम जामीन फेटाळून लावला
- २१ ऑगस्ट २०१९ - पी. चिदंबरम यांना त्यांच्या दिल्लीतील जोराबाग निवासस्थानातून सीबीआयने अटक केली.
दोन तासांच्या हायव्हॉल्टेज ड्राम्यानंतर सीबीआयने केली माजी केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम यांना अटक