वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणात कथित शिवलिंगाची सत्यासत्यता तपासण्यासाठी न्यायालयाने कार्बन डेटिंग करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया काय आहे, कार्बट डेटिंग म्हणजे काय हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
या भूतलावर जे जे म्हणून सजीव अस्तित्वात आहेत, त्यांची शरीरे अनेक रसायनांपासून बनलेली असतात. किंबहुना अखिल विश्वातील वस्तू जशा अणुरेणूंपासून बनलेल्या असतात तद्वत त्यामध्ये विविध प्रकारची रसायने उपस्थित असतात. नश्वर असलेले शरीर नष्ट झाले की त्याचा विलय होऊ लागतो. म्हणूनच एखाद्या झाडाचा वा प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या शरीरातील कार्बनचे प्रमाण हळूहळू घटू लागते. त्या झाडाचा वा प्राण्याचा मृत्यू कधी झाला, या काळाचा हिशेब त्याच्या अवशेषांमध्ये उपस्थित कार्बनवरून काढता येतो. निर्जीव वस्तूंच्या बाबतीत मात्र असे होत नाही. परंतु, दगड-धातूंचा बांधकामात वापर करताना त्यांचा स्पर्श लाकूड, कपडे, दोरी यासारख्या वस्तूंशी झालेला असतो.
या गोष्टींचे अंश त्या निर्जीव वस्तूंमध्ये सापडले तर त्या निर्जीव वस्तूचे वयोमान काढता येते. ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाचे वयोमान काढण्यासाठी नेमकी हीच पद्धत अवलंबली जाणार आहे. पुरातत्त्व खात्यात कार्बन डेटिंग प्रक्रियेचा सर्रास वापर केला जातो. भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक प्राचीन मंदिरे तसेच वास्तू आहेत. त्यांचा मागोवा घेताना अनेक आश्चर्यकारक गोष्टी उजेडात येतात. तेव्हा त्यांचे वयोमान किती हे ठरविण्यासाठी कार्बन डेटिंगचा प्रामुख्याने वापर केला जातो. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वापरली जाणारी ही एक मान्यताप्राप्त पद्धत आहे. त्यातून इतिहासाची अनेक रहस्ये उलगडली आहेत. कार्बन डेटिंग पद्धतीमुळे सेंद्रिय पदार्थांचे ६० हजार वर्षांपर्यंतचे वय अचूकपणे मोजता येते.
कोणी शोधली ही पद्धती? अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक विलार्ड लिब्बी यांनी १९४० मध्ये कार्बन डेटिंगची पद्धत शोधून काढली. कार्बन डेटिंगमध्ये सी-१४ हे एक समस्थानिक असते. त्याचे निम्मे आयुष्य ५,७३० वर्षे असते.