योगेंद्र यादव
डॉ. जय देव यांचे देहावसान आणि अंबालामध्ये त्यांच्या शोकसभेला उपस्थित राहिल्यानंतर या लेखाच्या शीर्षकात विचारलेले प्रश्न मला सतावत आहेत. राष्ट्रनिर्माण यासारखा शब्द आपल्या मन:पटलावर मोठ्या राष्ट्रीय नेत्यांची प्रतिमा उभी करतो. आपल्या मनाला अगदी सहज दिल्ली किंवा दुसऱ्या एखाद्या मोठ्या शहराकडे घेऊन जातो. कुणी नेता, अधिकारी किंवा एखादा प्रसिद्ध उद्योगपती आपल्या डोळ्यासमोर येतो. राष्ट्रनिर्माणाचा उल्लेख आल्यानंतर आपण साहजिकच सरकारचा विचार करतो. मोठ्या राष्ट्रीय धोरणांची चर्चा करतो. परंतु केवळ एवढाच विचार करणे वास्तव राष्ट्रनिर्माणापासून आपल्याला दूर नेते, हेही खरे आहे.
आजकाल राष्ट्रनिर्माण या शब्दाचा अर्थ फार उथळपणाने घेतला जातो. अमेरिकेच्या धर्तीवर अलीकडे जो कुणी पैसा कमावतो तो रोजगार निर्मिणारा असतो म्हणून आपोआपच ‘राष्ट्रनिर्माता’ म्हणण्यात येते. शिक्षणाचे दुकान उघडून बसलेल्या आणि त्यातून रग्गड कमाई करता करता राजकारणाचा धंदा करणाऱ्यांना ‘शिक्षणसम्राट’ आणि ‘भविष्याचे शिल्पकार’ म्हटले जाते. दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या स्टुडिओत बसून शेजाऱ्याला शिविगाळ करणाऱ्या आणि त्याच्याविरूद्ध लोकांना भडकवणाऱ्याला ‘राष्ट्रवादी’ असा किताब मिळतो. प्रत्यक्षात आपले राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रनिर्माण याची ही क्रूर चेष्टा आहे. यापासून बाजुला जाऊन कधी कधी आपली नजर देशाच्या भविष्यासाठी काही मोठे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि आंदोलनांकडेही वळते. या संघटना आणि आंदोलनांव्यतिरिक्त आपल्या देशात असे लाखो लोक आहेत जे कोणतीही सरकारी मदत न घेता, कुठलेही मोठे बॅनर न वापरता, गाजावाजा न करता काही निर्माणाचे काम करत असतात. अशा छोट्या छोट्या कामांना एकत्र आणल्याने जे होते ते खूप मोठे असते. खरेतर त्यालाच राष्ट्रनिर्माण म्हटले पाहिजे. १५ नोव्हेंबरला अंबालामध्ये वयाच्या ९८व्या वर्षी अंतिम श्वास घेतलेले डॉ. जय देव असेच एक राष्ट्रनिर्माते होते. गेल्या एक दशकभरापासून त्यांचा आशीर्वाद मला मिळत गेला. परंतु, ते इतके संकोची होते की, त्यांच्या शोकसभेतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू माझ्यासमोर येऊ शकले. अंबालातील लोक त्यांना एक यशस्वी व्यापारी, उद्योगपती, गांधीवादी आणि समाजसेवी म्हणून ओळखत होते. परंतु, केवळ समाजसेवा आणि राष्ट्रनिर्माण यातही फरक आहे. एखाद्या दुःखिताला मदत करणे माणसातला एक अद्वितीय असा गुण आहे. परंतु, असे दुःख निर्माण होऊ नये, याची व्यवस्था करणे समाजसुधारक आणि राष्ट्रनिर्माते यांचे काम असते. या दीर्घकालीन कामासाठी समाजसेवेबरोबरच आवश्यक असते ते संस्थांचे निर्माण, चरित्र निर्माण आणि मूल्यनिर्मिती. डॉ. जय देव यांनी आपल्या प्रदीर्घ आणि सार्थक जीवनात ही कामे केली.
गुरूकुल कांगडीमधून त्यांनी वैद्यकीय पदवी घेतली तेव्हा त्यांच्याकडे कोणतीही पारिवारिक संपत्ती नव्हती. त्यांनी प्रारंभी एक दवाखाना सुरू केला; नंतर औषधांचा घाऊक व्यापार सुरू करून तो पूर्ण उत्तर भारतात पसरवला. कालांतराने त्यांनी त्यांच्या वैज्ञानिक असलेल्या मुलाच्या मदतीने ॲडव्हान्स मायक्रोडिव्हाइसेस (एमडीआय) नावाची कंपनी काढली; जी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली वैज्ञानिक स्वरुपाची उत्पादने तयार करते. कंपनीची वार्षिक उलाढाल आता हजार कोटीच्या घरात पोहोचली आहे. त्यांनी हे सगळे गांधीवादाच्या मार्गाने केले. नफ्यासाठी इमानाशी कधी तडजोड केली नाही. गांधीजींचा ‘विश्वस्त’ हा सिद्धान्त मानून आपली कमाई ऐशोआरामावर खर्च करण्याऐवजी ते साधे जीवन जगले.
अंबाला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड रिसर्चच्या माध्यमातून डॉ. जय देव यांनी शिक्षण संस्थेचा पाया घातला. तिथे मॅनेजमेंट कोट्याच्या नावाने पैसे वसूल करण्याऐवजी गुणवत्तेवर प्रवेश दिले गेले. या तत्त्वामुळे त्यांच्या स्वतःच्या नातीला महाविद्यालयात प्रवेश मिळू शकला नव्हता. कुष्ठरोग्यांसाठी संस्था, मूक आणि बधिर विद्यार्थ्यांसाठी एक शाळा काढली. आता त्यांच्या कुटुंबाने मूक बधिरांच्या सांकेतिक भाषेचे रुपांतर आवाजात करण्याचे एक नवे सॉफ्टवेअर तयार करण्याचा प्रयत्न चालवला आहे. अंबालात चांगले इस्पितळ नाही, हे लक्षात घेऊन डॉ. जय देव यांनी रोटरी क्लबमधील अन्य सहकाऱ्यांना बरोबर घेऊन १०० खाटांचे एक कर्करोग आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे केले. हे इस्पितळ दरवर्षी १ लाख रुग्णांवर इलाज करते. येथे येणारे रुग्ण उपचारांसाठी येणारा केवळ खर्च शुल्क म्हणून देतात.
डॉ. जय देव यांनी गेल्या ६० वर्षांत अंबालात संगीतालोक नावाची एक वार्षिक शास्त्रीय संगीत महोत्सवाची परंपराही उभी केली. त्यामध्ये उस्ताद आमिर खान, कुमार गंधर्व, जसराज, राजन आणि साजन मिश्रा, किशोरी आमोणकर, अमजद अली खान आणि झाकीर हुसेन यांच्यासारख्या श्रेष्ठ कलावंतांनी आपली सेवा रूजू केली आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात संस्थानिर्माण, चरित्र निर्माण आणि मूल्य निर्माणाच्या या अनोख्या प्रयत्नांना राष्ट्रनिर्माण म्हणावयाचे नाही तर काय म्हणावयाचे? देशातील अशा अगणित, अनामिक राष्ट्रनिर्मात्यांची आठवण आपण ठेवली पाहिजे.