नवी दिल्ली - पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी आतापर्यंत १.५५ लाखाहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. रविवारी या योजनेसाठी वेबसाईट संध्याकाळी ५ वाजल्यापासून रजिस्ट्रेशनसाठी लाईव्ह करण्यात आली. या योजनेचं प्रायोगिक तत्वावर टार्गेट १.२५ लाख उमेदवारांचे होते. परंतु त्यापेक्षा अधिक उमेदवारांनी यावर रजिस्ट्रेशन केले आहे. २१ ते २४ वयोगटातील युवा या योजनेसाठी पात्र आहेत. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय 'www.pminternship.mca.gov.in' या पोर्टलद्वारे याची अंमलबजावणी होत आहे.
ही इंटर्नशिप २ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. योजनेतंर्गत एका इंटर्नला १२ महिन्यासाठी दर महिना ५ हजार मानधन आणि ६ हजार रुपये अनुदान दिले जाईल. मागील आठवड्यात तेल, गॅस, ऊर्जा आणि ऑटोसह २४ विविध क्षेत्रातील ८० हजाराहून अधिक पर्याय या पोर्टलला जोडले गेले आहेत. पोर्टलवरील आधार बेस्ड रजिस्ट्रेशन आणि बायो डेटा पडताळणी करून उमेदवारांना इंटर्नशिपची संधी दिली जाईल. या योजनेच्या पायलट प्रोजेक्टसाठी ८०० कोटी रुपये निधीची तरतूद आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट २०२४ मध्ये या योजनेची घोषणा करत १२ महिन्यासाठी भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी युवकांना दिली जाईल अशी माहिती दिली होती.
कुठे मिळणार संधी?
इंटर्नशिपसाठी इच्छुक उमेदवारांना २४ विविध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी दिली जाईल. ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटिव्ह, बँकिंग आणि वित्तीय सेवा इ. ऑपरेशन्स व्यवस्थापन, उत्पादन आणि उत्पादन, देखभाल, विक्री यासह २० हून अधिक कंपन्यांमध्ये इंटर्नशिप दिली जाईल. देशातील ३७ राज्यात आणि केंद्रशासित ७३७ जिल्ह्यांमध्ये ही इंटर्नशिप दिली जाईल.
इंटर्नशिपसाठी कोण करू शकतं अर्ज?
१२ वी नंतर ऑनलाई अथवा डिस्टेंस शिक्षण करणारे विद्यार्थी इंटर्नशिप कार्यक्रमासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांचे वय २१ ते २४ वर्षाच्या आत असायला हवे. २४ हून अधिक उमेदवारांनी अर्ज करू नये. त्याशिवाय ज्या युवकांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ८ लाख आणि त्याहून अधिक आहे, अथवा कुटुंबातील कुणी सदस्य सरकारी नोकरी करते तसेच IIT, IIM, IISER,IIIT, NLU सारख्या मोठ्या विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे असे उमेदवार या योजनेसाठी अपात्र आहेत. त्यामुळे अशांनी अर्ज करू नये.