एकीकडे इंडिया आघाडीतून लोकसभेसाठी बाहेर असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आणि आम आदमी पक्षाने केली आहे. त्यामुळे, इंडिया आघाडी बनण्यापूर्वीच बिघडताना दिसून येत आहे. त्यातच, बिहारमध्येही राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जेडीयू पुन्हा एकदा भाजपासोबत संसार थाटणार असल्याचे बोलले जात आहेत. त्यामुळे, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील राजकीय समिकरणे बदलण्याची दाट शक्यता आहे. त्य़ातच, आता काँग्रेसचेही १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त माध्यमांत झळकत आहे.
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा शेवटचा अंक लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता असून जेडीयू-आरजेडी महाआघाडी तुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार हे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सहभागी होणार असून याबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं समजते. नितीश कुमार यांच्या एनडीए प्रवेशात सध्या बिहारमध्ये सत्तेत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीची कोंडी होईल. त्यामुळे, लालू प्रसाद यादवही ऐनवेळी अनोखा डाव टाकत भाजप आणि जेडीयूला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. पण, आता काँग्रेसचे १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे समजते.
बिहार भाजपचे प्रमुख सम्राट चौधरी यांची सुशील कुमार मोदी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासमवेत दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत बैठक झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये, गृहमंत्री अमित शहांसोबत ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचेही समजते. दुसरीकडे काँग्रेसमधील १० आमदारही भाजपाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे, लवकरच बिहारमध्ये राजकीय सत्तांतराचे नाट्य पाहायला मिळू शकते. बिहारमध्ये काँग्रेसकडे १९ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यापैकी, १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे.
लालू प्रसाद यादवही डाकणार डाव?
पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव हेही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
भाजपात दोन गट
दरम्यान, नितीश कुमारांच्या जेडीयूने भाजपसोबत जाण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. मात्र नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. नितीश कुमारांना मुख्यमंत्री दिलं तर आपल्या हक्काच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यातूनच नितीश कुमारांच्या एनडीएतील घरवापसीची घोषणा रखडली आहे.