भारतीय जनाता पक्ष 2 सप्टेंबरपासून सदस्यत्व मोहीम सुरू करणार आहे. भाजपच्या म्हणण्यानुसार, एका मोबाइल क्रमांकावर कॉल करून, WhatsApp, QR कोड स्कॅन करून आणि NaMo अॅपच्या माध्यमाने पक्षाचे सदस्य होता येऊ शकते. या सदस्यत्व मोहिमेच्या माध्यमातून भाजप आपल्या सदस्यांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर माहितीही गोळा करणार आहे. यात पक्षाच्या सदस्यांची जात, लिंग, वय, निवास आदींचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपला जानेवारी 2025 मध्ये नवीन अध्यक्षाचीही निवड करायची आहे.
अशी होणार मोहीमेची सुरुवात? -भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा 2 सप्टेंबर 2024 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करून मोहिमेची सुरुवात करतील. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा सदस्यत्व मोहिमेचे प्रमुख विनोद तावडे यांनी सांगितले की, 'सदस्यत्व अभियानाचा पहिला टप्पा 25 सप्टेंबरपर्यंत चालेल. यानंतर, एक ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्यापूर्वी, याची समीक्षा केली जाईल. ही 15 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहील.'
16 ते 31 ऑक्टोबरपर्यंत, सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्यात येईल. हे सक्रिय सदस्य निश्चित संख्येने नवे सदस्य बनवून संघटनात्मक निवडणुकीत भाग घेऊ शकतील. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या पूर्णवेळ अध्यक्षाच्या निवडीपूर्वी कार्यकारी अध्यक्षाच्या नियुक्तीची कसलीही योजना नाही.
असे होऊ शकता सदस्य? -नवे लोक एका मोबाइल क्रमांकावर कॉल करून, QR कोड स्कॅन करून, वॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज करून, नमो अॅपच्या माध्यमाने आणि भाजपच्या वेबसाइटच्या माध्यमाने पक्षाचे सदस्य होऊ शकतात. मात्र, दुर्गम भागांत पक्ष पारंपरिक पद्धतीने कागदावरच रजिस्ट्रेशन करेल.
भाजपचे सध्या किती सदस्य? -तत्पूर्वी, या मोहिमेच्या माध्यमाने 10 कोटींहून अधिक सदस्य बनवीने पक्षाचे लक्ष्य असेल, असे भाजपने म्हटले होते. यात, पुढील काही महिन्यांत ज्या राज्यांत निवडणुका आहेत, त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. गेल्या वेळच्या सदस्यत्व मोहिमेनुसार, भाजपची सदस्य संख्या 18 कोटी एवढी होती. यावेळी हा आकडा पार केला जाईल, असा विश्वासही पक्षाने व्यक्त केला होता.