पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी नव्या संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्यासाठीची सर्व व्यवस्था पूर्ण झाली आहे. नवं संसद भवन जुन्या संसद भवनाचं स्थान घेणार आहे. भारतीय लोकशाहीच्या इतिहासात हा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. मात्र जुन्या संसदेने भारतीय लोकशाहीमधील अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले आहेत. मात्र बदललेला काळ आणि आधुनिक सुविधांच्या आवश्यकतेच्या दृष्टीने अपुरे पडू लागले होते. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेने प्रस्ताव पारित करून सरकारकडे एक नवे संसद भवन उभे करण्यासाठी आग्रह केला होता.
१९२६ मध्ये बांधण्यात आलेल्या या संसदेला पूर्वी कौन्सिल हाऊस म्हणून ओळखले जात असे. या इमारतीमध्ये इंपिरियल लेजिस्लेटिव्ह कौन्सिल होती. स्वातंत्र्यानंतर ही इमारत भारताचं संसद भवन बनली. तसेच या इमारतीने स्वातंत्र्यदिन आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील अनेक ऐतिहासिक क्षण पाहिले.
जुन्या संसद भवनाच्या तुलनेत नवे संसद भवन खूप वेगळे आहे. यात खासदारांसाठी एक लाऊंज, एक वाचनालय, अनेक समिती कक्ष, भोजन कक्ष आणि पुरेशी पार्किंग व्यवस्था आहे. तसेच एक भव्य संविधान कक्षही आहे. तर जुनी संसद ही आकाराने गोलाकार आहे. नवी संसद ही चार मजली आणि त्रिकोणी आहे. तिचं निर्मिती क्षेत्र हे ६४ हजार ५०० एवढं आहे. तर जुन्या संसदेचं क्षेत्र २४ हजार २८१.१६ मीटर एवढं आहे. जुन्या संसदेमध्ये १२ दरवाजे होते. तर नव्या संसदेमध्ये तीन मुख्य दरवाजे आहेत. येथे व्हीआयपी, खासदार आणि अतिथींसाठी वेगवेगळे दरवाजे आहेत.